

नगर : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी सोने-वाहन खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड उडाली होती. सराफ बाजारात सोनेखरेदीसाठी गर्दी, तर दुचाकी-चारचाकी खरेदीसाठी विविध शोरूममध्ये सकाळपासून गर्दी होती. त्यातून पाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
अतिवृष्टी आणि अवकाळीचा फटका वगळता यंदाचे वर्ष निर्विघ्न पार पडले. शेतकर्यांच्या खिशात पैसा खुळखुळला की बाजारपेठेत नवचैतन्य पाहायला मिळते. त्याचाच प्रत्यय आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आला. नगर शहरातील सराफ बाजार व वाहनांच्या बाजारात ग्राहकांची गर्दी होती. वाहनखरेदीसाठी अनेकांनी गेल्या आठ दिवसांपासून बुकिंग केली होती.
त्यात मोटारसायकल, मोपेड दुचाकी, ई-बाईक, मोटारकार, ट्रॅक्टरचा समावेश आहे. दुचाकीच्या प्रत्येक शोरूमध्ये सरासरी 70 ते 80 वाहनांची विक्री झाल्याचे समजते. तसेच, टीव्ही-फ्रीजसारख्या अन्य छोट्या मोठ्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीही ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती.
ई-बाईकला पसंती
गेल्या काही दिवसांपासून बाजारात ई-बाईकला पसंती मिळत आहे. ई-बाईकची किंमत जास्त असली, तरी पेट्रोलची झंजट नको म्हणून ग्राहक ई-बाईकला पसंती देताना दिसत आहेत.
ऑनलाईन खरेदी जोमात
मोबाईल, संगणक, लॅपटॉप अशा वस्तू खरेदीसाठी ग्राहक ऑनलाईनचा पर्याय निवडतात. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ऑनलाईन कंपन्यांनी डिस्काउंट स्कीम ठेवल्याने ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केल्याचे सूत्रांकडून समजले.
ग्राहकांचा हिरमोड
नगर शहरातील शोरूममध्ये होंडाची मनपसंत बाईक उपलब्ध नसल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला. या बाईक घेण्यासाठी ग्राहकांनी अगोदर बुकिंग केली होती. मात्र आज आलेल्या ग्राहकांना ती न मिळाल्याने त्यांनी पुणे, औरंगाबाद गाठल्याचे समजते.
दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह होता. मोपेड दुचाकी ग्राहकांनी गेल्या आठ दिवसांपासून बुकिंग केली होती. सरासरी आज दिवसभरात 70 ते 80 दुचाकी ग्राहकांनी खरेदी केल्या.
– संदीप भापकर, सुझुकी मिडासकेंद्र सरकारने 1 एप्रिलपासून हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांवर एचयूआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) हा सहा अंकी क्रमांक बंधनकारक केल्याने सराफांनी दागिने हॉलमार्क सेंटरमध्ये ठेवले आहेत.
– नरेंद्र लोळगे, सराफ व्यावसायिक, नगरगुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने आणि लग्नसराईमुळे आज सराफ बाजारात प्रचंड गर्दी होती. शुद्ध सोने खरेदीकडे ग्राहकांची पसंती होती. ग्राहकांच्या गर्दीने बाजारात नवचैतन्य निर्माण झाले होते.
– सागर कायगावकर, सराफ व्यावसायिक
24 कॅरेटलाच ग्राहकांची पसंती
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेक ग्राहकांनी सराफ बाजारात हजेरी लावून, पारंपरिक दागिन्यांपेक्षा 24 कॅरेट पिळ्याचे वेढेे, बिलवरी अंगठी व कॉइनची खरेदी केली. 24 कॅरेटच्या मागणीत वाढ झाली. बुधवारी सावेडी व नगर सराफ बाजारात सोने 57 हजार 900 रुपये तोळा (जीएसटीसह) आणि चांदी 68 हजार 100 रुपये किलो दराने विकली गेली. गेल्या तीन वर्षांपासून सोन्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीत हमखास परतावा मिळतो. या उद्देशाने ग्राहकांनी पाडव्याचा मुहूर्त साधताना पारंपरिक दागिन्यांपेक्षा पिळ्याचे वेढे, बिलवरी अंगठी, लक्ष्मी, गणपती, क्वॉइन, चैन, बांगड्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवार हा सुटीचा दिवस असूनही सराफ बाजार आज गजबजला होता.