नगर : ज्येष्ठांना साहित्य देणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान : खासदार डॉ. सुजय विखे पाटील

नगर : ज्येष्ठांना साहित्य देणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान : खासदार डॉ. सुजय विखे पाटील
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपुर्ण विश्वात नाव झाले आहे. त्यांनी 'सबके साथ सबका विकास' असे घोषवाक्य घेवून सुरु केलेले काम लोकमान्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावाकडील ज्येष्ठ नागरीकांना आवश्यक असलेले साहित्य वाटप करणारे ते पहिले पंतप्रधान असल्याचा खुलासा अहमदनगरचे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. येथील उत्सव मंगल कार्यालयामध्ये आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील बोलत होते. भाजपाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी सभापती नानासाहेब पवार, जि.प. माजी सदस्य शरद नवले, शहराध्यक्ष मारुती बिंगले, नगरसेवक जितेंद्र छाजेड, रवी पाटील, दीपक चव्हाण, गिरीधर आसने, सरपंच बाबा चिडे, गणेश मुदगुले, विठ्ठलराव राऊत, अनिल भनगडे, दीपाली चित्ते, तहसीलदार प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. विखे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ज्येष्ठ नागरीकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली. या योजनेचा निधी यापुर्वी परत जात होता, परंतु आपण प्रत्येक कुटुंबासाठी आपले संपुर्ण आयुष्य झीजविणारे साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरीक वारसांच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित राहतात. अशा ज्येष्ठ माणसांची सेवा करण्याची ही संधी असल्याचे समजुन मी या योजनेत लक्ष घातले. देशासाठी 70 कोटी रुपयांची तरतुद असलेल्या या योजनेतील 40 कोटी एकट्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आणले. या योजनेचे साहित्य दिल्लीपासून गावापर्यंत येण्यासाठी वेळ लागला, परंतु ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विखे कुटुंबियावर विश्वास ठेवून प्रतीक्षा केली, त्या सर्वांना साहित्य वाटप करण्याची संधी मिळाली, याचे मोठे समाधान आहे.

प्रारंभी भाजपा तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी प्रास्ताविक भाषणात श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या विकासात विखे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. ना. विखे मंत्री होताच शहरासाठी 5 कोटीचा निधी दिला. भविष्यात शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी हॉस्पीटल होणे गरजेचे आहे. त्यासाठी 5 एकर जमीन उपलब्ध आहे. खा. विखे पाटील यांनी दवाखाना उभारावा, असे आवाहन केले. यावेळी शरद नवले, दीपाली चित्ते, गणेश मुदगुले, विठ्ठलराव राऊत, अनिल भनगडे आदींची भाषणे झाली. सुत्रसंचालन संतोष मते यांनी केले. आभार मारुती बिंगले यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांना चहा, नाष्टा व साहित्य वाटपासाठी चोख नियोजन करण्यात आले होते.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी संपुर्ण आयुष्यभर गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. गरीबांचे आशिर्वाद असेल तर सत्ता असो अथवा नसो फरक पडत नाही. गेल्या 50 वर्षांत विखे परिवाराकडे सत्ता येत-जात राहिली, परंतु आज गरिबांच्या आशिर्वादामुळे माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील राज्यात दोन नंबरचे मंत्री झाल्याचे समाधान आहे, असे खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितले.

शेती महामंडळाची जमीन लाटणार्‍यांना सोडणार नाही

शेती महामंडळाचा प्रश्न सोडविण्यासाठी विखे कुटुंबियांनी मोठे परिश्रम घेतले आहे, परंतु सदरची जमीन वाटपात अनेकांनी जमीन बळकावली आहे. अनेकांनी जमिनीच्या मोबदल्यात खंडणी गोळा केल्या आहे. ज्यांनी शेतीमहामंडळाची जमिन बळकावली त्यांना सोडणार नाही. ती परत घेतली जाईल, असा इशारा खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी दिला.

शेती महामंडळाची जमीन गरिबांच्या घरासाठी देणार

शहरालगतच्या कोट्यावधी रुपयाच्या अनेक जमिनीचे वाटप अद्याप बाकी आहे. शहरालगत बळकावलेल्या जमिनी परत घेवू. तसेच शिल्लक जमीन पंतप्रधान आवास योजनेसाठी दिली जाईल. पुढच्या दोन वर्षात प्रत्येक गरीबाला घर देणार असल्याची घोषणा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news