नगर, शिर्डीत संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी : मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा

नगर, शिर्डीत संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी : मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. जर्मनीबरोबर केलेल्या सामंजस्य करारातून 4 लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे. दावोस येथील गुंतवणूक परिषदेत 3 लाख 73 हजार कोटींचे करार करण्यात आले असून त्यातून 2 लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 2 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. नगर व शिर्डी येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली.

नगर येथे नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी उपस्थित होते.

नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे हे सरकार तरूणांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. रोजगार मेळाव्यातून लाखो तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले, राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला.

34 जिल्ह्यातील 250 तालुक्यातील 511 गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी 50 हजार तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मेळाव्यात प्रत्येकाला गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. नमो महारोजगार मेळावा अनेकांना पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी कौशल्य प्रबोधनी सुरू करण्याची घोषणा केली. पंधरा दिवसांच्या आत शिर्डी व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल.

एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना 15 दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रस्ताविक केले. कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी आभार मानले.

23 हजार रोजगारनिर्मिती

गत वर्षात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगासाठी देण्यात आली आहे. 5 हजार 14 कोटींचे सामंजस्य करारातून 23 हजार रोजगाराची निर्मिती होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी प्रयत्न असल्याचे विखे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील किमान एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. गत वर्षात जिल्ह्यातील 18 हजार तरूणांना रोजगार निर्माण होईल असे उपक्रम राबविण्यात आले. 500 एकराच्या तीन एमआयडीसी जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी शासकीय जमिन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

– डॉ. सुजय विखे पाटील, खासदार

  • 64 हजार तरुणांची नोंदणी
  • 302 कंपन्यांचा सहभाग
  • 10 हजार रोजगार निर्माण होणार
  • 648 उद्योजकांसोबत सामंजस्य करार
  • 5 हजार 14 कोटींची गुंतवणूक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news