अकोले, पुढारी वृत्तसेवा: कोल्हार- घोटी राज्य मार्गावरील राजूर- विठा घाटातील वळणावरील पुलाला पडले भंगदाड, असे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची राजूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तत्काळ दखल घेत भगदाड पडलेला पुल पाडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. तर पुलाच्या नुतनीकरणाचे काम होणार असल्याने वाहन धारक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोल्हार घोटी राज्य मार्गावरील बारी- राजुर-अकोले- संगमनेर रस्त्याच्या नुतनीकरण व रुंदीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. मात्र, विटा घाटातील रस्ता हा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने कोतुळ फाटा ते विटा घाट, बागडदरा पर्यंत रस्ता रुंदीकरणास वनविभागाचा अडथळा येत होता. परंतु, या रस्त्याच्या मंजुरीला गेली चार वर्षे पूर्ण होऊन तरी देखील ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभागाने वन विभागाकडून विठा घाटात रस्ता रुंदीकरणाबाबत परवानगी अद्यापही घेतलेली नव्हती. तर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विठा घाटात तात्पुरती डागडुजी ठेकेदारांकडून केली जात होती.
रात्री- अपरात्रीच्या वेळी चालकांना त्या मोऱ्यांजवळील खड्याचा अंदाज येत नसल्याने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. अकोले, विठाघाट- राजूर या रस्त्यावरील पुलाला भगदाड पडल्याने धोकादायक ठरले होते. याबाबत दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने भगदाड पडलेल्या पुलासभोवताली सुरक्षेसाठी बॅरेकेट लावले होते. त्यानंतर आता पुल पाडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक राजूर- चितळवेडे- अकोले अशी वळविण्यात आली आहे.
हेही वाचा