अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश; करमाळा पोलिसांची कामगिरी | पुढारी

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश; करमाळा पोलिसांची कामगिरी

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या अथवा अपघातग्रस्त वाहनातून डिझेलची राजरोस चोरी करणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला. यातील एका आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे.

अनिल सुभाष पवार रा. मांडवा ता. वाशी जिल्हा धाराशिव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपींकडून 45 लिटर डिझेल, डिझेल भरण्याची प्लास्टिक कॅन, बांगडी पाईप तसेच डिझेलची टाकी फोडण्याचे टोकदार हत्यार या सह एक स्कॉर्पिओ गाडी ,आदि साहित्य असा पाच लाख 54 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, 19 मार्च रोजी रात्रीच्या वेळी अहमदनगर ते करमाळा रोड लगत थांबलेल्या कंटेनर मधील डिझेलची चोरी झाल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनोद प्रभू घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आले होते . सदरची टोळी महामार्गावरील जातेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या सुमारास संशयीतांचा शोध घेतल्यानंतर पोलीस पथकाला जातेगाव परिसरात काही इसम डिझेलची चोरी करताना आढळून आले. यावेळी पोलिसांना पाहुन त्यांनी पळ काढला. यावेळी गुंगारा देऊन वाहनासह पळून जात असताना जिवाची बाजी लावत एकास करमाळा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन इतर संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक माहुलकर, हवालदार अझहर शेख, बालाजी घोरपडे, राजेश रोडगे, चंद्रकांत ढवळे, सोमनाथ जगताप, जालिंदर गोरे, मेजर आनंद पवार, पंकज पलंगे यांच्या पथकाने केली आहे. याबाबत हवालदार अझहर शेख व बालाजी घोरपडे पुढील तपास करीत आहेत .

Back to top button