

नगर : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जोरात सुरु आहे. मंगळवारी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, या यादीवर 27 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांची तसेच नेवासा नगरपंचायतींच्या प्रभागरचना पूर्ण झाली आहे. त्यानंतर आरक्षण कार्यक्रम देखील आयोगाने जाहीर केला आहे. 1 जुलै रोजी आरक्षणाची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरु केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नऊ नगरपरिषदेत व नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.
या याद्यांवर 21 जून ते 27 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकती आपाल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हरकतींवर सुनावणी होऊन 1 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर 5 जुलै रोजी मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिध्द केली जाणार असल्याचे नगरपरिषद विभागाचे सह आयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.