पिंपरी : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग

पिंपरी : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रमुख 13 रस्त्यांचे महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. सध्या आठ ते दहा ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क' सुरू आहे. ही संकल्पना अद्याप नागरिकांनी पूर्णतः स्वीकारलेली नाही. मात्र, नागरिकांना ऑफ स्ट्रीट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिकेकडून ऑन स्ट्रीट पार्किंगसाठी (रस्त्यावरील पार्किंग) जादा दर आकारला जाणार आहे. ऑन स्ट्रीट पार्किंगचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश त्यामागे आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी दिली; तसेच शहरात विविध ठिकाणी मल्टिलेव्हल पार्किंग उभारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने शनिवार (दि. 17) 'संवाद आयुक्तांशी' हा 'फेसबुक लाइव्ह' कार्यक्रम झाला. वाहतूक आणि पार्किंगचे व्यवस्थापन या विषयावर आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी या विषयाशी निगडित प्रमुख 10 प्रश्न निवडले होते. त्यांची उत्तरे दिली. तसेच, नागरिकांकडून ऑन द स्पॉट आलेल्या काही प्रश्नांचीदेखील उत्तरे दिली. त्या वेळी आयुक्त बोलत होते.

शेखर सिंह म्हणाले, 'ऑफ स्ट्रीट पार्किंग म्हणजे आपण विविध ठिकाणी मल्टिलेव्हल पार्किंग उभारतो आहोत. भोसरी येथील सखुबाई उद्यान, वायसीएम रुग्णालय परिसर, पिंपरी भाजी मंडई, पिंपरी क्रोमा सेंटरजवळ, चिंचवड स्टेशनजवळ असे पार्किंग सुरू केले जात आहे. रस्त्यावर होणार्‍या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा होतो. ही बाब लक्षात घेता ऑन स्ट्रीट पार्किंगचे प्रमाण कमी करून ऑफ स्ट्रीट पार्किंग वाढविण्यावर भर राहणार आहे. 'पे अ‍ॅण्ड पार्क'बाबत महापालिकेने खासगी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात दोन तृतीयांश लोकांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रतितास 20 रुपयांपर्यंत 'पे अ‍ॅण्ड पार्क'साठी पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. तर, काही लोकांनी 50 रुपये प्रतितास देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

उड्डाण पुलाखाली पार्किंग व अन्य सुविधा

आयुक्त शेखर सिंह यांचा हा पहिला फेसबुक लाइव्ह कार्यक्रम होता. त्यांनी या फेसबुक लाइव्हमध्ये वाहतुकीशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाशझोत टाकला. शहरातील विविध उड्डाण पुलांखाली पार्किंगची सुविधा देण्याबरोबरच काही ठिकाणी खेळांची सुविधा, उद्यान तयार केले जाणार आहे. जगताप डेअरी येथील उड्डाण पुलाखाली स्मार्ट टॉयलेट सुरू केले आहे. सर्व उड्डाण पुलाखालची जागा आपण वापरत आहोत. त्यामुळे रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकणार आहे.

खासगी बसेससाठी करणार पार्किंग

शहरात सध्या रस्त्यांवरच खासगी बसेस थांबत असल्याने या बसेस उभ्या करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व्हावी, या दृष्टीने 'पे अ‍ॅण्ड पार्क' धर्तीवर नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी एक ते दोन ठिकाणी जागा निवडल्या आहेत. त्याचप्रमाणे, एका शहरातून दुसर्‍या शहरात होणार्‍या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या बसेससाठीदेखील बस टर्मिनसची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याबाबतदेखील नियोजन सुरू असल्याचे आयुक्तांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news