श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बहुचर्चित अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व धर्मांतर करुन, बेकायदा निकाह व सामूहिक अत्याचार, मुलीची विक्री, वेशा व्यवसाय आदी गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इम्रान युसूफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर याच्यासह 6 जणांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी हे आदेश बजावले. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी याप्रकरणी सखोल तपास करून संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्याला आय. जी. बी. जे. शेखर पाटील यांनी मंजुरी दिली.
सामाजिकदृष्टया अतिशय गंभीर व संवेदनशील अशा धर्मांतर करुन, अपहरण, बेकायदा निकाह व सामूहिक अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांची दखल घेत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तब्बल 6 आरोपींना अटक केली. आरोपी पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडून धक्कादायक असे मुलीचे अपहरण करुन धर्मांतर, अत्याचार निकाह व सामूहिक अत्याचार व वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची थेट विक्री केल्याचे वास्तव समोर आले.
अट्टल गुन्हेगारांना जरब बसविणार्या पोलिस कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. या आरोपींविरुद्ध तब्बल 50 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सखोल तपास केल्याने या गुन्हेगारांची काळी कृत्ये जनतेसमोर आली. मोक्का लागल्याने आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे. या प्रकरणी आवाज उठवत भाजप आ. निलेश राणे यांनी श्रीरामपुरात मोर्चा काढला होता. आरोपींना इतके दिवस कोण मदत करीत होते, याचा तपास सुरु आहे. लव जिहाद प्रकरणाची राज्यासह देशभर चर्चा झाली होती.
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षकस्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पी. आय. हर्षवर्धन गवळी, ए.पी.आय. बोरसे, पी.एस.आय. सुरवडे, एल.पी.एन. अश्विनी पवार, पी.एन. संतोष दरेकर, पी.सी. रविंद्र माळी, विलास उकिरडे यांनी केली.
राज्यातील पहिली घटना..!
याप्रकरणातील प्रमुख आरोपी इम्रान युसूफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटरसह 6 आरोपींच्या टोळीने संघटितपणे गुन्हे केले. अल्पवयीन मुलीचे केवळ अपहरणच नव्हे तर तिच्यावर अत्याचार करून, विक्री करून अत्याचाराची परिसिमा गाठली. आता मोक्कानंतर न्यायालयाच्या परवानगीने तपासासाठी 90 दिवसांचा अवधी वाढणार असल्याने आणखी सखोल तपास करणार असल्याचे सांगत अशा पद्धतीच्या संघटित गुन्हेगारीत मोक्का लागल्याचे कदाचित हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे, अशी प्रतिक्रिया पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
महिलेसह सहाजणांचा समावेश..!
याप्रकरणी प्रमुख आरोपी इम्रान युसूफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर (रा.वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्यासह पप्पू ऊर्फ प्रशांत दादासाहेब गोरे, सुमन मधुकर पगारे, सचीन मधुकर पगारे, बाबासाहेब एकनाथ चेंडवाल व मिनाबाई रूपचंद मुसावत या सहा जणांविरुद्ध मोक्काअंर्तंगत कारवाई झाली.
टोळ्या रडावर..!
इम्रान युसूफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटरसह टोळीविरुद्ध मोक्का कायद्यार्तंगत कारवाई झाली. या स्वरुपाच्या गुन्हेगार टोळ्यांना मोक्का लावणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिल्याने या टोळ्या रडारवर आहेत.