राहाता : ‘गणेश’च्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे : खासदार डॉ. सुजय विखे पाटील

राहाता : ‘गणेश’च्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे : खासदार डॉ. सुजय विखे पाटील

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गणेश सहकारी साखर कारखाना चालविताना राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सर्व निर्णय प्रक्रिया केल्या. भविष्यात चांगले काम करायचे आहे. निवडणुकीच्या निमित्ताने बाहेरचे येतील आणि निघून जातील. पण कारखान्याच्या हिताकरीता निवडणूकीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर संपूर्ण गणेश परिसरातील सभासदांच्या बैठकीत खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, माजी संचालक मोहनराव सदाफळ, भागुनाथ गाडेकर, भाऊसाहेब जेजूरकर, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, दिगंबर कोते, विजय जगताप, डॉ. धनंजय धनवटे, गंगाधर चौधरी, साहेबराव निधाने, रावसाहेब देशमुख, कैलास सदाफळ, दीपक तुरकणे, दीपक रोहोम, ज्ञानदेव गोंदकर, ज्ञानदेव चोळके, वाल्मिकराव गोर्डे, संदीप लहारे, भाउसाहेब शेळके, भाऊसाहेब घोरपडे, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे, बाळासाहेब गमे, राजेंद्र पठारे, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब डांगे, संतोष गोर्डे यांचेसह परिसरातून आलेले सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, राजकीय प्रक्रिया म्हणून काही लोक या परिसरात येतात, शब्द देतील आणि निघून जातील. पुन्हा निवडणूक आली की, शब्द देतील. या परिसरातील जे त्यांच्यासाठी पळाले ते यांच्या मुलाच्या लग्नाला तरी येतात का? मंत्री विखे पाटील यांनी मात्र त्यांचे एकतरी काम केलेले असेल. त्यामुळे बाहेरच्यांवर विश्वास ठेवू नका. या भागात येऊन भाषण करून गेले त्यांची पात्रता काय? हे आपण आताच सांगणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात समाचार घेऊ.

गणेशच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. संघटनेने सांगितल्याशिवाय कार्यकर्त्यांनी अर्ज भरू नये. नियोजनबद्ध कार्यक्रमात कुणी संघटनेचा कट्टर कार्यकर्ता विसरायला नको, संघटनेच्या सुचनेनुसारच कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करावेत. बाजार समितीत राष्ट्रवादीत होते पण आपल्या संघटनेत आले त्यांना आपण संधी दिली. हे करतांना आपल्याला संघटनेतील सर्वाना सहभागी करून घ्यावे लागते. सर्वांना सामावून घेवून समाजाचे प्रश्न कसे सुटतील, हे आपण पाहातो असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के म्हणाले, मंत्री विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गणेश चांगला चालावा म्हणून त्याची क्षमता वाढविली. गणेशला तोट्याचा शाप आहे. गणेशच्या माध्यमातून काही जण या भागात राजकारण करतील. त्यामुळे चांगल्या कामाला गालबोट लागू नये, आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेशचे माजी संचालक मोहनराव सदाफळ म्हणाले, गणेश च्या निवडणुकीत राजकारण न आणता ती बिनविरोध करावी. बाहेरचे लोक येतील खोटे अश्वासन देतील. गणेश ची निवडणूक लढविणे म्हणजे गोत्यात पाय असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी गंगाधर चौधरी यांचेही भाषण झाले. प्रास्तविक गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ यांनी केले. ते म्हणाले, ना. विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांनी गणेशवर 30 ते 35 लाख रुपये खर्च केले. कारखान्याची क्षमता 1700 वरुन 3500 वर नेली. बाहेरुन उस आणुन कारखाना चालविला. शेवटी आभार उपाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मानले.

संघर्ष विखे घराण्याला नव्याने नाही ः डॉ. विखे

संघर्ष हा विखे घराण्याला नव्याने नाही. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार होती पण ती काहिंनी लावली. कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी आम्ही ताब्यात घेत नाही. ती चांगली चालली पाहिजे. गणेश कारखाना चालविण्यासाठी, कामगारांचे कुटुंब चालविण्यासाठी, शेतकर्‍यांचे कुटुंब चालविण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी मोठी रक्कम गणेश मध्ये गुंतविली आहे. तरीही चेहर्‍यावर दु:ख ठेवले नाही. आम्हाला पैशाचा मोह नाही. आमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news