

नगर : पुढारी वृत्तसेवा : मार्चमधील बेमुदत संप स्थगित करण्यासाठी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याच्या निषेधार्थ तसेच जुन्या पेन्शनसह इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नगर शाखेच्या वतीने क्रांती दिनानिमित्त बुधवारी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 14 मार्च ते 20 मार्च या कालावधीत राज्यभरातील सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी बेमुदत संप आंदोलन करून जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत 20 मार्च रोजी समन्वय समितीच्या सुकाणू समिती सदस्यांची सरकारबरोबर चर्चा झाली. सरकारने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता अद्याप झाली नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी मोटारसायकल रॅली काढली. जलसंपदा कार्यालयापासून या रॅलीस प्रारंभ झाला.
विविध प्रलंबीत मागण्यांचे फलक हातात घेऊन कर्मचार्यांनी शहरातून रॅली काढली. डीएसपी चौक, कोठला, जुने बसस्थानक, टिळक रोड, दिल्ली गेट, लालटाकी, सावेडी, गुलमोहर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या रॅलीचा समारोप झाला. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या रॅलीत सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील पंडित,महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, वैभव सांगळे, वंदना नेटके, डॉ. मुकुंद शिंदे, सुरेखा आंधळे, सांदीपन कासार, भाऊसाहेब शिंदे, नलिनी पाटील, विलास पेद्राम, सुधाकर साखरे, विजय काकडे, गिरीश गायकवाड, गणेश कोळकर, महादेव शिंदे, संदीप बनसोडे, धनसिंग गव्हाणे, विष्णू काटकर, नितीन मुळे, मंजुषा बागडे, वैशाली बोडखे, आदींसह सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
हेही वाचा :