

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : 'तुमच्या आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी अन् भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लोकशाही पध्दतीने उपोषण सुरू केले. या अंदोलनातून त्यांनी शासनाचे प्रशासनाचे, राज्यकर्त्यांचे लक्ष वेधलये, म्हणून सरकार त्यांच्या म्हणण्याला वारंवार दाद देतये, झुकतये म्हणले तरी वावगे ठरणार नाही. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, मी आणि माझ्या मतदारसंघातील पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील पदाधिकार्यांसह शनिवारी (दि.9) रात्री उशिरा अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. भेटी दरम्यान आमदार प्रा. शिंदे व पदाधिकार्यांनी जरांगे पाटलांशी संवाद साधत त्यांच्या अंदोलनास पाठिंबा दिला.
आमदार राम शिंदे म्हणाले, श्रीमंताचे श्रीमंत झाले, गरिबांचे गरिब झाले आणि म्हणून गरिबांच्या हक्क, न्यायासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारलाय, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. त्यांना जो पाठींबा मिळतोय त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळतेय. त्यांची मागणी रास्त आहे. रास्त मागणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.
यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, सोमनाथ पाचरणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, भाजप शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, बापुराव ढवळे, बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, वैजीनाथ पाटील, नगरसेवक अमित चिंतामणी, अॅड. प्रवीण सानप, अध्यक्ष अशोक महारनवर, राहूल चोरगे आदी उपस्थित होते.
सामान्य मराठा समाज असेल किंवा सामान्य धनगर समाज असेल, आरक्षण हा आमच्या दोघांचाही मुळ प्रश्न आहे. श्रीमंत धनगर बांधवाचा नाही आणि श्रीमंत मराठ्यांचाही नाही. आम्हा गोरगरिबांना तुम्ही श्रीमंतांनी जर पाठिंबा दिला तर आमची दोन्ही जमात नक्कीच गोरगरीबीतून श्रीमंत होतील, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
'आरक्षण मिळवल्याशिवाय थांबणार नाही'
जरांगे पाटील म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय. आज तुम्ही आशीर्वाद दिला आणि आम्हाला पाठबळ दिले. त्यामुळे आम्ही शंभर टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय थांबणार नाही.
हे ही वाचा :