अकोले: तहसीलदारांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसावं लागेल : किरण लहामटे

अकोले: तहसीलदारांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसावं लागेल : किरण लहामटे

अकोले(नगर), पुढारी वृत्तसेवा : अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार सतिश थेटे उपस्थित राहत नसतील, तर ही खेदजनक बाब असुन जनतेला कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रथम जनता मग इतर काम या नियमाने अधिकाऱ्याचा कारभार चालायला पाहिजे. कामात हलगर्जीपणा केल्यास मला विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

अकोले तहसीलदार कार्यालयात आमदार किरण लहामटे यांनी अचानक भेट दिल्यावर तहसील आणि पोलीस स्टेशन परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेबाबतं कान टोचले. तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश थेटे नसल्याने नायब तहसीलदार ठकाजी महाले यांच्याबरोबर शाब्दिक चकमक झाली. तसेच या पाहणीत रखडलेली पिक पाहणी, उतारा नोंदी, आर्थिक दृष्ट्या मागास प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, अल्पभूधारक राष्ट्रीत्व, भूमिहीन महिला आरक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका वारसापत्राची कामे रखडल्याचे वास्तव समोर आले. तर महिनाभरात रेशन कार्ड देणे बंधनकारक असतानाही ३७२ नवीन रेशन कार्ड ऑगस्ट महिन्यापासून रेशनकार्ड धारकांना दिले नसल्याचे रजिस्टरवर आढळून आले. उंचखडक येथील नागरिक भिकाजी खरात हे वर्षभरापासून तहसील कार्यालयात नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी हेलपाटे मारत असल्याची निदर्शनास आल्याचे पाहुन लहामटे यांनी सर्वच विभागातील कामाचा आढावा घेतला. यावेळी तहसीलमधील अनेक कामं रखडल्याचे आढळून आले. रखडलेली कामे पाहून आमदार लहामटे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचा सूचना देखील दिल्या. कामात हलगर्जीपणा यापुढे घेतला जाणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले.

पुढे लहामटे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना अधिकाऱ्यांवर वचक होता. आता अधिकाऱ्यांवर सरकारचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये मुजोरी आल्याचे दिसत आहे. सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, अकोले तालुका हा वेगळ्या विचारसरणीचा आहे. तसेच या क्रांतिकारी तालुक्यात वेगळं काही खपवून घेतलं जाणार नाही. असे झाल्यास मला विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा देखील लहामटे यांनी दिला.

यावेळी सरकारी कामात हलगर्जीपणा करणाऱ्याची गय केली जाणार नसल्याचा सज्जड दम तहसील कार्यालयाच्या झाडाझडतीत आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला. यावेळी निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले, नायब तहसीलदार गणेश माळवे,नायब तहसीलदार सुधिर उंबाळे,नायब तहसीलदार दत्ता वाघ,जयवंत भांगरे, दत्तु कोल्हाळ, गणेश मंडलिक,सोमनाथ किरवे आदि उपस्थित होते.

ग्रामस्थ व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून तहसीलदार सतिश थेटे हे शुक्रवारी लवकर जातात आणि सोमवारी दुपारी येतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवार, रविवारी काही आपत्कालीन घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची बाब खेदजनक आहे. अकोले तालुका अतिदुर्गम आहे. तालुक्यातून कामासाठी येणाऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका, नाहीतर तुमच्या पगारातून हेलपाटे मारण्यासाठी भाड्याचे पैसे द्या. तसेच कामात सुधारणा करा.

– आमदार डॉ. किरण लहामटे

logo
Pudhari News
pudhari.news