निळवंडेत योगदान नसलेलेच श्रेयासाठी पुढे : आमदार बाळासाहेब थोरात

निळवंडेत योगदान नसलेलेच श्रेयासाठी पुढे : आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले आहे. कालव्यांच्या कामासाठी महाविकास आघाडीच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला. मात्र उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे या निळवंडेमध्ये योगदान आहे यापैकी कोणीच नव्हते. ज्यांचे योगदान नाही, ते श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली.

तालुक्यातील संगमनेर-कुरण-पारेगाव खुर्द – नान्नज दुमाला ते सिन्नर हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आ. थोरात यांच्या हस्ते झाला. त्या वेळी कुरण येथे झालेल्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. निसार शेख, उबेद शेख, लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, लक्ष्मण कुटे, भास्कर शेरमाळे, सरपंच मुद्दसर शेख, उपसरपंच नदीम शेख, शबीर शेख, इजाज शेख, कुरणचे ग्रामविकास अधिकारी गंगाधर राऊत आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सध्या जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण केले जात आहे. सध्याचे राजकारण लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. जातीय हेतूने होत असलेले ध्रुवीकरण हे संविधान अन् लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल हा सामान्य माणसाला आवडलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकासकामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकासकामांना स्थगिती दिली होती. ही विकासकामांची स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली आहे. त्यामुळे आता रखडलेली कामे पूर्ण होतील. अडचणीचा काळ थोड्या दिवसांसाठी राहणार आहे. पुढे महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. बाजार समितीचे माजी संचालक उबेद शेख यांनी प्रास्ताविक केले. अमृतवाहिनी बँकेचे संचालक निसार शेख यांनी आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news