

नगर : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी गावामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत निधी मंजूर आहे. मात्र, यात झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या चौकशीचे वरिष्ठांचे आदेश मिळताच सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी याप्रकरणी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव प्रशांत वाघ यांनी याप्रकरणे देवढे यांना सूचना केल्या आहेत. त्यात सामजिक न्याय विभागाअंतर्गत शिरसाटवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीमध्ये पथदिवे न बसविता ते गावात इतरत्र किंवा दुसर्या वर्गाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
तसेच शिरसाटवाडी येथील दलितवस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरणा यासाठी आलेला निधी चुकीच्या पध्दतीने वापरला असून यामध्ये पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्या अनुषंगाने दि.18 जुलै रोजीच्या तक्रारी पत्रास अनुसरुन आपला सविस्तर अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात यावा, असे वाघ यांनी म्हटले आहे. त्यानुसार, देवढे यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :