

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून हजारो सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेतील पदभरतीला आता मुहूर्त सापडला आहे. लवकरच 937 जागांची ही भरती केली जाणार असून, त्यासाठी शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची पदभरती करण्यासाठी प्रशासनाने बिंदुनामावलीपासून आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी परीक्षा शुल्क म्हणून एक हजार रुपये आकारण्याचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत आहेत; मात्र नुकतेच तलाठी पदाच्या परीक्षा अर्जासोबत एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आल्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. त्यामुळे झेडपीतील भरतीसाठी परीक्षा शुल्क कमी असावे, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.