नगर : पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरात गोवर आजाराने डोकेवर काढल्यानंतर राज्यात सर्वत्र अतिरिक्त गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान तीन हजार 457 बालकांना डोस देण्यात आला आहे. त्या लसीकरणातून राहिलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून, त्यांच्यासाठी 15 डिसेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. गोवर आजाराने मुंबई शहरात चांगलेच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरात आठ दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेऊन गोवर लसीकरणाचा आढावा घेतला होता. त्यात गोवर प्रतिबंधक समिती नेमण्यात आली.
आयुक्त डॉ. पंकज जावळे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबईमध्ये गोवर आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने मनपाच्या वतीने सतर्कतेची मोहीम राबविण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने घरोघर जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे 572 बालकांनी गोवरचा पहिला व दुसरा डोस घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. तर, आतापर्यंत सुमारे 4 हजार 200 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातून हुकलेल्या 572 बालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. 15 ते 25 डिसेंबर 2022 पर्यंत बालकांना पहिला डोस देण्यात येणार आहे. 15 ते 25 जानेवारीला बालकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरणासठी नागरिकांनी बालकांना जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
जिजामाता आरोग्य केंद्र बुरूडगाव, महात्मा फुले आरोग्य केंद्र माळीवाडा, नागापूर, मुकुंदनगर, केडगाव, तोफखाना, सावेडी येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका सलीकरणासाठी मेहनत घेत आहेत.
15 डिसेंबरपासून गोवर लसीकरणातून नातेवाईकांच्या गैरसमजुतीमुळे राहून गेलेल्या बालकांना डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तीन दिवसांत 155 बालकांना पहिला डोस तर, 169 बालकांना दुसरा डोस देण्यात आला.