

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या लग्नास वडिलांनी नकार दिला. मात्र, आईसह आजोबांनी ठाणे (कळवा) येथील एका तरुणाशी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. दरम्यान, या प्रकरणी घारगाव पोलिसांत अल्पवयीन मुलीच्या आईसह आजोबा, आजी व मामा या चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पुन्हा दाखल झाला आहे.
घारगाव पोलिसांनी सांगितले की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागात साकूर जवळ बिरेवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले मुलीचे वडील पत्नी व मुलीसह ठाणे (दिवा) येथे नोकरीनिमित्त गेले होते. त्यांनी साडेसतरा वर्षीय मुलीला संगमनेर तालुक्यात कोठे बु. येथील मामाकडे शिक्षणास पाठवले. नंतर काही दिवसांनी त्यांची कंपनी बंद पडल्यामुळे ते पत्नी व दोन मुलींसह बिरेवाडी येथे आले होते.
दरम्यान, मुलीला चांगले स्थळ आले. तिचे लग्न करू, असे मुलीचे आजोबा, आई व मामाने तिच्या वडिलांना सांगितले.
मात्र मुलीचे वय पूर्ण झाले नाही. त्यामुळे लग्न करता येणार नाही, असे वडिलांनी सांगितले. मुलीच्या वडिलांचे व आईचे एकमत नव्हते. दोघांचे कायम भांडणे होत असे. यानंतर ती मुलीस टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे घेऊन गेली. गणपती मंदिरात तिने एका तरुणाबरोबर तिचे लग्न केले. ही माहिती वडिलांना समजल्यानंतर त्यांनी थेट घारगाव पोलिस ठाणे गाठले. कैफियत पो. नि. सुनील पाटील यांच्यासमोर मांडली.
याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीनंतर घारगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे आजोबा, आजी, आई व मामा या चौघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.