नगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज मतदान

नगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज मतदान

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. पहिल्याच टप्प्यात राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, शिवाजीराव कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके आणि आमदार मोनिका राजळे या दिग्गजांच्या मतदार संघातील संगमनेर, नगर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर आणि पाथर्डी अशा सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज शुक्रवार 28 रोजी मतदान होणार आहे. राहुरी बाजार समितीची मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, उर्वरित सहा बाजार समित्यांच्या उद्या 29 रोजी होणार्‍या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांसाठी निवडणूक रंगात आलेली आहे. यातील सात बाजार समित्यांचा प्रचार थंडावून, आज शुक्रवार दि.28 रोजी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. बाजार समितीच्या सत्तेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्वच डावपेच टाकलेले आहेत. सर्वच तालुक्यांत परस्परविरोधी लढणार्‍या दोन्ही मंडळांकडून मतदारांना जेवनावळी, सहल, आणि विशेष भेटवस्तूही पोहच झालेल्या आहेत.

स्थानिक सत्ताधारी आमदारांनीही बाजार समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी किंवा खेचून आणण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसले आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात असेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दुसर्‍या टप्प्यातही चुरशीच्या लढती असणार आहे. यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार रोहित पवार, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातील बाजार समित्यांचा समावेश आहे. या ठिकाणी 30 एप्रिल रोजी मतदान, आणि त्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. या निकालावरच पुढील राजकारणाची समीकरणे तयार होणार असल्याचेही सांगितले जाते.

'त्या' सर्वच मतदारसंघात मतदानाचा हक्क

जर एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदार संघाच्या अंतिम मतदारयादीत समाविष्ट असल्यास त्या मतदारास त्या त्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे. त्यामुळे सोसायटी, ग्रामपंचायत किंवा अन्य मतदारसंघात नाव असल्यास संबंधितांना सर्वच ठिकाणी मतदानाचा अधिकार असेल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news