राजूरमध्ये दारू विकणार्‍यांच्या घरावर मोर्चा!

राजूरमध्ये दारू विकणार्‍यांच्या घरावर मोर्चा!

अकोले : पुढारी वृत्तसेवा : दारूबंदीच्या गावातच सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी लोकनियुक्त सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडेसह ग्रामपंचायत सदस्यही रस्त्यावर उतरले. यावेळी दारु विकणार्‍या चार घरांची झडती घेण्यात आली. त्यानंतर थेट पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांना राजुरमधील अवैध दारु, मटक्याबाबत धारेवर धरल्याचे दिसले. यावेळी सरोदे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. राजुर ग्रामपंचायतीची गुरुवारी मासिक बैठक झाली. यात अवैध दारू विक्री करणार्‍यावर कारवाईचा विषय चर्चेला येताच लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रा. पं सदस्या आक्रमक होत थेट मच्छी मार्केट, बाजारपेठ, दिगंबर रस्त्यालगत असलेल्या अवैद्य दारू विक्री करणार्‍या दुकाने आणि घरांची झाडाझडतीसाठी निघाले.

यावेळी चार घरांची झडती घेतली पण अवैध दारू मिळून आली नाही. त्यानंतर सरपंच, सदस्य व ग्रामस्थ हे राजूर पोलिस स्टेशनला पोहचले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासमोरच गावात अवैध दारू, मटक्यावरून सरपंच पुष्पा निगळे सह पदाधिकार्‍यांनी पोलिसांवर आर्थिक आरोप केला. यावेळी अवैध दारू विकणार्‍या घरमालकांवर गुन्हे दाखल करा, अशीही मागणी केली.
यावेळी राजुरचे उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच गणपत देशमुख, सदस्य प्रमोद देशमुख, अतुल पवार, हर्षद मुतुडक, राम बांगर, संगीता मैड, संगीता जाधव, पुष्पा भांगरे, संगिता मोहडुळे, लता सोनवणे, ग्रामसेवक राजेंद्र वर्पे, शेखर वालझाडे, अक्षय देशमुख, सुरेश नवाळी, देवराम जाधव, हेमंत हंगेकर, किसन असवले व महिलासह नागरीक उपस्थित होते.

पोलिसांना दमबाजी करून दारूचे बॉक्स पळविले

कोतुळ येथील आठवडा बाजार बंदोबस्तावर असताना दुपारी चार वाजल्याच्या सुमारास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनांनुसार एका मोटर सायकलवरून देशी दारूचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने शिदवड फाटा येथून कोतुळ गावचे दिशेने येत असल्याची समजले होते. त्यानुसार कोतुळ गावचे मुळा नदीपात्राचे पुलावर पोलिसांनी सापळा लावला.यावेळी विजय बाबुराव खरात त्याचे मोटारसायकलवर लहान मुलास पाठीमागे बसून दोन गोण्यांमध्ये देशी दारू विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना सापडला.

त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी ते ताब्यात घेतले असता विजय खरात यांनी त्याच्या घरी फोन केल्याने कमल विजय खरात, सागर विजय खरात, दत्तात्रय निवृत्ती खरात, अनिल निवृत्ती खरात हे सर्वजण त्या ठिकाणी आले व पकडलेले दारूचे बॉक्स सोडून द्यावे, यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांना दमबाजी केली. तसेच देशी दारूचे दोन बॉक्स असलेली गोणी मोटरसायकलवर टाकून सागर खरात व विजय खरात हे पळून गेल्याची फिर्याद पो.काँ. महिंद्र गुंजाळ यांनी दिली आहे.

दारूविक्रेत्यांचे तडिपारीचे प्रस्ताव पाठविले!

मला येऊन दोन-तीन महिने झाले आहेत. ज्या वेळेस दारूला विरोध व्हायला पाहिजे, तेव्हा विरोध झाला नाही. असो, दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करणार आहे. मात्र कायदा हातात घेऊ नका, अवैध दारू विकणार्‍यांच्या घरावर बोजा चढवून तडीपारीचे प्रस्ताव पाठवले असल्याचे स.पो.नि. दीपक सरोदे यांनी सांगितले.

फोन करूनही पोलिसांची कारवाई नाही!

राजूर गावातील अवैद्य दारू धंद्यामुळे ग्रामपंचायत व पदाधिकारी बदनाम झाले आहेत. माझ्या गल्लीत अवैद्य दारू खाली होताना पाहून पोलिस स्टेशनला फोन केले, तरी पण कुठलीही कारवाई अद्यापही पोलिसांनी केलेली नाही. गावातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांना राजूर ग्रामपंचायत व पदाधिकारी आणि नागरिक सर्व सहकार्य करणार असल्याचे राजूरच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पा निगळे यांनी सांगितले.

दारूविक्री केल्यास वीज, पाणीपुरवठा बंद!

राजूर गावातील दारू विक्री बंद करा. यापुढे जर दारू विकताना कोणी दिसून आला तर दारू विकणार्‍याच्या घरांचा वीज पुरवठा, पाणीपुरवठा बंद करण्यात येईल आणि घराची अतिक्रमणे काढणार असल्याचा सज्जड दम पदाधिकार्‍यांनी दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news