नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांची देयके काढली. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी केला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शेळके यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन बांधकाम विभागाकडील सर्व टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले, मनपाकडे माहिती अधिकाराच्या अर्जात 1 मार्च 2016 ते 16 ऑक्टोबर 2020 च्या कालावधीतील बांधकाम विभागअंतर्गत सर्व कामांचे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची मागणी केली होती.
माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर 26 एप्रिल 2023 रोजी सर्व माहितीची कागदपत्रे मनपाने मोफत दिली. त्यात 1 मार्च 2016 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील 778 टेस्ट रिपोर्ट व 86 थर्ड पार्टी रिपोर्ट बांधकाम विभागाकडे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्याद्वारे प्रमाणित असलेले आहेत. दरम्यान, याच कालावधीतील तीच माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे मागितली असता त्यांनी 10 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी सर्व माहिती दिली. त्यानुसार त्यांनी 329 टेस्ट रिपोर्ट दिले व एकही थर्ड पार्टी रिपोर्ट दिला नाही, असे स्पष्ट केले आहे.
यावरून नगर महापालिकेकडे असलेले सर्व थर्ड पार्टी रिपोर्ट हे बनावट असल्याचे स्पष्ट होते. तसेच, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने 329 टेस्ट रिपोर्ट दिलेले आहेत, असे असताना आपल्या मनपाकडे 778 टेस्ट रिपोर्ट आले कुठून, असा सवाल उपस्थित होत आहे. दोन्ही संस्थांकडील उपलब्ध माहितीनुसार सुमारे 449 टेस्ट रिपोर्ट खोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असा दावा शेळके यांनी केला आहे. त्यामुळे मनपाच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. याची सखोल चौकशी करावी. चौकशी होईपर्यंत अधिकारी व कर्मचार्यांचे पगार थांबविण्यात यावेत. संबंधित ठेकेदार संस्थेची देयके थांबवावीत अशी मागणी केली आहे.