

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार्या दोन महिलांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर गेल्या आठ दिवसांपासून टाळे ठोकलेल्या मालदाड ग्रामपंचायतीचे टाळे खोलण्यात आले. मालदाडच्या श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी बिगर शेती जागेबाबतचा दाखला सरपंच गोरक्ष नवले का देत नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी प्रियंका योगेश नवले व सीमा अरुण नवले ग्रामपंचायत कार्यालयात आल्या होत्या. 'सरपंच कोठे आहेत, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे. त्यांना फोन करुन बोलावुन घ्या,' असे या दोघींनी ग्रामसेवक काळे यांना सांगितले. यानंतर काळे यांनी सरपंच नवले यांना फोन लावला असता, 'मी बाहेर गावी आहे,' असे त्यांनी सांगितले.
यानंतर 'इमारत दाखल्याबाबत गट विकास अधिकारी अनिल नागणे यांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचे आंदोलन करू नका,' असे ग्रामसेवक काळे यांनी त्या महिलांना समजावून सांगितले. यावर महिला म्हणाल्या, 'आम्हाला आजच दाखला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व महिला ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावू,' असे म्हणत ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा बंद करून कुलूप लावले. ग्रामसेवक काळे यांना कार्यालयात काम करण्यास अटकाव केला. दरम्यान,'जोपर्यंत ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार्या महिलांवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीचे टाळे काढणार नाही,' असा पवित्रा सरपंच गोरक्ष नवले, उपसरपंच गणेश भालेराव, विलास नवले, विपुल नवले व सदस्यांनी घेतला. गटविकास अधिकार्यांच्या दालनासमोर ते आक्रमक झाले. गट विकास अधिकार्यांनी ग्रामसेवक रामदास काळे यांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.
अखेर ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्ववत !
पोलिसांनी सीमा नवले व प्रियंका नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. विस्तार अधिकारी सुनील माळी, सरपंच गोरक्ष नवले, ग्रामसेवक रामदास काळे, पोलिस विष्णू आहेर यांच्या उपस्थित तब्बल 8 दिवसानंतर टाळे उघडून ग्रामपंचायतीच्या कामकाजास सुरुवात केली.