जेऊर कक्षात लम्पीने 93 जनावरे बाधित

जेऊर कक्षात लम्पीने 93 जनावरे बाधित

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात लम्पी आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांचा या आजाराने बळी घेतला आहे. जेऊर कक्षात इमामपूर येथील बैलाचा लम्पीने सोमवारी (दि. 21) मृत्यू झाला. जेऊर कक्षात आठ गावांमध्ये एकूण 93 जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. जेऊर पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत सुमारे बारा गावे येत असून, त्यातील आठ गावांनी लम्पीचा संसर्ग आढळून आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण मार्गदर्शन शिबीर तसेच जनजागृती करण्यात आली आहे. त्यातील 50 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. बाकीच्यांवर उपचार सुरू आहेत.

नगर तालुक्यात आजपर्यंत सुमारे 40 जनावरांचा लम्पीने बळी घेतला असून 600 जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इमामपूर येथील शेतकरी ऋषिकेश नामदेव टिमकरे यांच्या बैलाला लम्पीची बाधा झाली होती. त्यावर उपचार सुरू होते. परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. सदर मृत्यू झालेल्या बैलाचे लसीकरण झाले नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. जेऊर कक्षात लम्पी आजाराने जनावराचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. लंपी आजाराचा संसर्ग मुख्यतः गोमाशा,

डास, गोचिड यामुळे पसरत असून याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जेऊर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, किरण कदम, धोंडीराम ठोंबरे, संदीप तोडमल, रामदास तोडमल, गणेश टिमकरे यांनी मृत बैलाच्या शेतकर्‍याच्या घरी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरातील पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

पशुपालकांनी आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत. सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. जनावरांमध्ये लंपी आजाराचे लक्षणे दिसताच तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
                                                                            -डॉ. राजेंद्र शेटे,
                                                                         पशुवैद्यकीय अधिकारी

लम्पी आजाराचा संसर्ग प्रामुख्याने डास, गोमाशा, गोचीड यापासून पसरत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपले गोठे स्वच्छ ठेवावेत. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी.
                                                                         -भीमराज मोकाटे,
                                                                         सरपंच, इमामपूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news