नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील 3 हजार 754 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे 33 टक्के नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 7 हजार 307 शेतकर्यांना बसला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात 12 हजार 399 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविला आहे.
शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाने कहर केला.
ऐन काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी पाच तालुक्यांतील 50 गावांतील 6 हजार 685 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दुसर्या दिवशी शनिवारी देखील अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे चार तालुक्यातील 47 गावांतील 1 हजार 960 हेक्टर पिकांना तडाखा बसला.
तिसर्या दिवशी रविवारी देखील अवकाळी पाऊस झाला.नगर, पारनेर, जामखेड, राहुरी, संगमनेर,अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांतील 31 गावांतील 3 हजार 754 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांसह फळबागांचे नुकसान झाले. यामध्ये पारनेर तालुक्यातील सर्वाधिक 2 हजार 220 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
कोपरगाव तालुक्यातील 3 गावांतील 414, राहाता तालुक्यातील 4 गावांतील 405 हेक्टर, राहुरी तालुक्यातील 4 गावांतील 350, संगमनेर तालुक्यातील 4 गावांतील 320, नगर तालुक्यातील 7 गावांतील 43, पाथर्डी तालुक्यातील 2.80 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय जिल्ह्यात 810 हेक्टर शेतपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. यामध्ये नगर तालुक्यातील 48, कोपरगाव तालुक्यातील 17, नेवासा तालुक्यातील 620, राहुरी तालुक्यातील 125 हेक्टर पिकांचा समावेश आहे. 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतपिकांना नुकसानभरपाई दिली जात नाही. जिल्ह्यात या प्राथमिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
तीन दिवसांतील नुकसान (हेक्टर)
नगर :1226, कर्जत 156, कोपरगाव 414.86, नेवासा 4300, पारनेर 2400, पाथर्डी 2.8, राहुरी 698, संगमनेर 600, शेवगाव 2197, राहाता 405.
नऊ जनावरे दगावली
गेल्या तीन दिवसांच्या पावसात मनुष्यहानी झाली नाही. मात्र, जामखेड, नेवासा, कर्जत व शेवगाव या चार तालुक्यांतील प्रत्येकी 1 या प्रमाणे 4 मोठी जनावरे दगावली तर नगर तालुक्यात 5 लहान जनावरे दगावली आहेत. नगर तालुक्यातील 3, नेवासा तालुक्यातील 2 व शेवगाव तालुक्यातील 2 अशा सात जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले.याशिवाय नगर तालुक्यात तीन कोंबड्या देखील दगावल्या आहेत.
332 घरांचे नुकसान
वादळी वारे आणि अवकाळी पावसाने 332 घरांचे अंशत: पडझड झाली. यामध्ये पारनेर तालुक्यातील सर्वाधिक 153 घरांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील 28, नेवासा तालुक्यातील 81, शेवगाव तालुक्यातील 30, संगमनेर तालुक्यातील 18, राहुरी तालुक्यातील 10, पाथर्डी तालुक्यातील 7, कर्जत तालुक्यातील 3 व जामखेड तालुक्यातील एका घरांचे नुकसान झाले आहे.