एलईडी चोर बनावट ग्राहकाच्या जाळ्यात; एलसीबीची कारवाई

एलईडी चोर बनावट ग्राहकाच्या जाळ्यात; एलसीबीची कारवाई

Published on

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारातील शुभम ट्रेडर्स फोडून 10 एलईडी टीव्हीसह तांब्याची भांडी चोरून नेल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरीपूल येथे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 एलईडीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. प्रवीण श्रीधर काळे (वय 24, रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ज्ञानेश्वर मनोहर जाधव (वय 28,) संतोष अशोक कांबळे (वय 24, दोघे रा. वाळुंज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोपान भिकाजी शिकारे (रा. धनगरवाडी, जेऊर, ता. नगर) यांचे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरूमचे लोखंडी शटर तोडून कामगार बाबूलाल राजभर याचे हातपाय बांधून मारहाण करुन शोरुम 19 मार्च रोजी फोडले. त्यातून एक लाख 55 हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे 27 एलईडी व तांब्या पितळाचे भांडे चोरुन नेले. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, आकाश काळे, देवेंद्र शेलार, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर यांचे पथक नेमले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरील गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण काळे (रा. छत्रपती संभाजीनगर) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. शुभम ट्रेडर्समधील चोरी केलेल्या मालापैकी काही एलईडी विक्रीसाठी पांढरीपुलावर साथीदारांसह येणार आहे असेही समजले. त्यानुसार पोलिस पथकाने पांढरीपूल येथे सापळा लावला.

त्यांना एक मोटारकार रस्त्याच्या कडेला संशयितरित्या उभी दिसली. सहायक पोलिस निरीक्षक थोरात यांनी काही अंमलदारांना बनावट ग्राहक म्हणून संशयितांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावर पथकातील कर्मचार्‍यांना वाहनाजवळ जाऊन संशयितांशी चर्चा करून एलईडी खरेदीची तयारी दाखविताच संशयितांनी एलईडी कमी किंमतीत देण्याची तयारी दाखविल्याने पथकाची खात्री झाली. पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनीवरील प्रमाणे नावे सांगितली. त्यांच्याकडे एलईडीबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख 26 हजार रुपये किंमतीचे पीएचएक्स कंपनीचे 32 इंची 9 एलईडी, 14 हजार रुपये किंमतीचा 32 इंची एक एलईडी व 4 लाखांची मोटारकार असा 5 लाख 40 हजार रुपयांचेे मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी प्रवीण श्रीधर काळे हा गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध गंगापूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी संतोष अशोक कांबळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news