Nagar : संरक्षण कायद्यासाठी वकील आक्रमक

Nagar : संरक्षण कायद्यासाठी वकील आक्रमक
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  वकिलांवर होणारे हल्ले थांबावेत, राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्याकांडातील आरोपींना 'मोक्का' लावावा, हा खटला जलदगती कोर्टात चालवून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. जिल्हा न्यायालयापासून निघालेल्या या मोर्चात आमदार बाळासाहेब थोरात, संग्राम जगताप व लहू कानडे यांच्यासह शेकडो वकील सहभागी झाले होते. महिला वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एक वकील लाख वकील, अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लागू झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश गुगळे यांच्यासह सर्व तालुक्यांच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर महामोर्चा अडविण्यात आला. यावेळी वकिलांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड. संदीप शेळके, उपाध्यक्ष अ‍ॅड. महेश शेडाळे, महिला सहसचिव अ‍ॅड. भक्ती शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सहसचिव अ‍ॅड. संजय सुंबे, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. अमोल अकोलकर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड. विनोद रणसिंग, अ‍ॅड. देवदत्त शहाणे, अ‍ॅड. शिवाजी शिंदे, अ‍ॅड. रामेश्वर कराळे, अ‍ॅड. अस्मिता उदावंत आदींसह माजी पदाधिकारी, सर्व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी वकिलांच्या मागण्या व भावना शासनापर्यंत पोहचविण्याची ग्वाही दिली.

वकीलपत्र घ्यायचे की नाही? : थोरात
मोर्चासमोर बोलताना आमदार थोरात म्हणाले, की संगमनेर तालुका बार असोसिएशनचा सदस्य व आमदार म्हणून मी या महामोर्चास पाठिंबा देत आहे. राहुरीच्या घटनेने सर्व वकिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पुढील काळात वकिलांनी गुन्हेगारांचे वकीलपत्र घ्यायचे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वकिलांना निर्भीडपणे काम करण्यासाठी राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा.

आ. संग्राम जगताप म्हणाले, की वकिलांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ या आंदोलनाला नुसता पाठिंबा न देता वकील संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी येत्या अधिवेशनात पाठपुरावा करून आवाज उठवणार आहे.  जळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष रामकांत पाटील म्हणाले, की वकिलांनी खासदार, आमदार व मंत्र्यांच्या केसेस चालविणे थांबवावे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधींना जागे होऊन वकिलांच्या मागण्या शासनाकडे मांडतील.

बार असोसिएशनचे श्रीगोंद्याचे अध्यक्ष अ‍ॅड. मोटे, पाथर्डीचे अ‍ॅड. राजेंद्र खेडकर, नेवाशाचे अ‍ॅड. कल्याण पिसाळ, श्रीरामपूरचे अ‍ॅड. व्ही. एन. पाटील, कर्जतचे अ‍ॅड. कैलास शेवाळे, शेवगावचे अ‍ॅड. रामदास बुधवंत आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हा समन्वय समितीचे संदीप पाखरे, लक्ष्मीकांत पठारे, अजित वाडेकर, अ‍ॅड. रोडे, अ‍ॅड. ठोमसे, अ‍ॅड. मिसळ, अ‍ॅड. डोके, अ‍ॅड. येवले, अ‍ॅड. नितीन दिघे, अ‍ॅड. पठारे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news