

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेची तिसगावकडे जाणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने रविवारी (दि.11) पहाटेपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
मिरी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून साईड पट्ट्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायतचीही पाईपलाईन आहे.
या ठिकाणी अनेक वेळा मिरी-तिसगाव पाईपलाईन लिकेज होते. रविवारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे तिसगावसाठी होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. बस स्थानक परिसरामध्ये या मुख्य पाईपलाईनला लोखंडी पाईप वापरावेत, जेणेकरून पुन्हा पाईपलाईन फुटून पाणी वाया जाणार नाही, अशी मागणी शिवसेना नेते भागिनाथ गवळी, एकनाथ झाडे, विजय गवळी, रोहित झाडे यांनी केली आहे.