नेवासा : कुकाणा राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर!

file photo
file photo

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : शहापूर-घोटी-विशाखापट्टणम् हा राज्यमार्ग 50 राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून, या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनातर्फे केंद्राकडे सादर करण्यात आला. यामुळे नेवासा तालुक्यातील कुकाणा गाव आता राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार आहे. शहापूर-घोटी-विशाखापट्टणम् (व्हाया अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई) या राज्य मार्गाला केंद्र सरकारकडून 2017 मध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वतः मान्यता मिळाली होती.

या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होण्यासाठी माजी खासदार स्व. दिलीप गांधी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्यती कार्यवाही करून 20 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर राज्य शासनाच्या वतीनेही कार्यवाही पूर्ण होऊन 9 डिसेंबर 2022 रोजी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून जाणारे कल्याण-विशाखापट्टणम्, शहापूर-घोटी-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्ग आहेत. यापैकी कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाचे काम बीड जिल्ह्यातील गेवराईपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे घोटी-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाला गेवराई येथे जोडायाचे आहे. शहापूर-घोटी-विशाखापट्टणम् या मार्गावर औद्योगिक, कृषी, साखर कारखाने जास्त प्रमाणात असल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर व हा मार्ग पठारी भागातून जात असल्याने अवजड मालाची वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर याच रस्त्याचा वापर करतात.

या मार्गावर शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड, नेवासा, औंढा नागनाथ, माहूर, तिरुपती बालाजी आदी देवस्थाने असल्याने, भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हा राज्यमार्ग अपुरा पडत आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर चौपदरीकरण होऊन सर्व अडचणी दूर होणार आहेत.

शेतीमाल मुंबईला नेणे होणार सुलभ
राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर रियल इस्टेट प्लॉटिंग, हॉटेलिंग व अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस येणार आहेत. शेत जमीन व अन्य जागांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. शेतकर्‍यांना आपला शेतीमाल मुंबईला नेण्यासाठी सुलभता येणार आहे.

भारतमाला योजनेत समावेशाची मागणी
शहापूर-घोटी-विशाखापट्टणम या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेल्याने, या मार्गास भारतमाला योजना दोनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news