कोपरगाव : कोल्हे कारखान्याची देशात ओळख होईल : साखर आयुक्त गायकवाड

कोपरगाव : कोल्हे कारखान्याची देशात ओळख होईल : साखर आयुक्त गायकवाड
Published on
Updated on

कोपरगाव(नगर); पुढारी वृत्तसेवा : सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योग स्पर्धेत टिकण्यासाठी सतत तंत्रज्ञान विकास बदलांचा विचार दिला. त्याच तालमीत त्यांचे नातू विवेक कोल्हे तयार झाले. त्यांनी कारखानदारीच्या माध्यमातून फार्मा निर्मितीवर लक्ष केंद्रित करून पॅरासिटामॉल औषध उत्पादनावर भर दिला. त्यांच्यासह संचालक मंडळाच्या दूरदर्शी वाटचालीमुळे सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी काळात भारतात नवी ओळख निर्माण होईल, असे गौरवोद्गार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

साखर उद्योगात महाराष्ट्र जगात तिसर्‍या स्थानावर आहे. सहकारासमोर खासगीचे आव्हान आहे, पण साखर कारखानदारी व त्यात कार्य करणार्‍या युवा नेतृत्वाने यातील बदलांचा वेळीच अभ्यास करावा. तशी ध्येय-धोरणं हाती घेऊन स्वतःची वेगवेगळी उत्पादने घेत ओळख निर्माण केली तरचं साखर उद्योग टिकेल, असा सल्ला आयुक्त गायकवाड यांनी दिला.

'सर' ही मानद उपाधी मिळाल्याबद्दल त्यांचा कोल्हे कारखाना कार्यस्थळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार केला. यानिमित्त अ.नगर, नाशिक व संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यकारी संचालकांचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे होत्या. राज्य विक्रीकर विभागाचे ट्रायब्यूनल जज्ज सुमेरकुमार काले, सहसंचालक शरद जरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राज्य सहकारी साखर संघाचे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचा योगायोगाने वाढदिवस असल्याने आयुक्त गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण केले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात कोल्हे साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

बिपीनराव कोल्हे म्हणाले, 'संजीवनी' चे संस्थापक स्व. कोल्हे यांनी खासगी कारखानदारीशी संघर्ष करीत सहकाराला पाठबळ दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून उपपदार्थ निर्मितीसह कोल्हे कारखान्याची देशात वेगळी ओळख निर्माण केली. पद्मश्री डॉ. विठठलराव विखे पा., डॉ. बाबुराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब विखे पा., मारुतराव घुले, शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, शंकरराव काळे, आप्पासाहेब राजळे, यशवंतराव गडाख आदी नेतृत्वाने ग्रामीण अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमांतून उर्जा देण्याचे अ.नगर जिल्ह्यात मोठे काम केले. या सर्वांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा.

गायकवाड यांनी अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या समस्या ओळखून त्यांना पदाच्या माध्यमातुन न्याय देण्याचे चांगले काम केल्याने त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. साखर कारखानदारीत आधुनिकीकरणाच्या साथीने असंख्य वेगवान निर्णय घेत अंमलबजावणी करणारे उत्तम कुशल प्रशासक अशी ओळख नगर जिल्ह्याच्या या सुपुत्राने निर्माण केल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, मनेष गाडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, उषा संजय औताडे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड आदींच्या हस्ते कार्यकारी संचालकांचा सत्कार झाला. आभार उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी मानले. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, प्रदीप गुरव, अ‍ॅड. तुळशीराम कानवडे व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे कामगार नेते मनोहर शिंदे, माजी सभापती सुनील देवकर, अशोक साखर कारखान्याचे संचालक श्री. शिंदे, सभासद शेतकरी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंद पडलेले 24 साखर कारखाने सुरू केले..!

नवनवीन सुधारणा आत्मसात करून 100 वेगवान निर्णय घेत त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. राज्यातील अडीच कोटी शेतकर्‍यांचे आशिर्वादाचे पाठबळ असल्यामुळेच अडचणींवर मात करत पुढे जाता आले. गेल्या तीन वर्षात इथेनॉल, आसवनी, सहवीज निर्मितीसह अन्य क्षेत्रात 30 हजार कोटींची गुंतवणुक झाली. बंद पडलेले 24 साखर कारखाने सुरू करता आले. यातून हजारोंना रोजी रोटी मिळाल्याचे साखर आयुक्त गायकवाड म्हणाले.

साखर आयुक्त गायकवाड यांना माणसांच्या मनाची जोड मिळाल्याने त्यांचे प्रशासकीय कामकाज प्रेरणादायी आहे. त्यांची 23 पुस्तके अभ्यासपूर्ण आहेत.

                                                       – स्नेहलताताई कोल्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news