

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फेर मतमोजणीमध्ये कोणताही बदल न होता जैसे थे परिस्थिती राहिली. उलट ज्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, त्या सर्वांची मते कमी झाल्याचे दिसून आले. बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या गटाला प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष सभापती व उपसभापती निवडीकडे लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नऊ जागांसाठी आज समितीच्या सभागृहामध्ये फेर मतमोजणी झाली. मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उमेदवार किंवा प्रतिनिधीशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला नाही. मतमोजणीसाठी इतर तालुक्यातून कर्मचारी आणण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी एक वाजता संपली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार पवार व आमदार शिंदे यांच्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठा संघर्ष झाला, तो अद्यापही संपलेला नाही. सुरुवातीला दोघांनाही समान म्हणजे नऊ जागा मिळाल्या होत्या. आ. शिंदे यांच्या गटाचे भरत पावणे व लीलावती जामदार या दोघांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार लीलावती जामदार यांच्याकडून 50 हजार रुपये व भरत पावणे यांच्याकडून 50 हजार रुपये मतमोजणीची फी भरून घेण्यात आली. त्यानंतर मतमोजणी करण्यात आली.
मंगेश जगताप 502, गुलाब तनपुरे 460, काकासाहेब तापकीर 528, नंदराम नवले 460, अभय पाटील 566 संग्राम पाटील 461 रामदास मांडगे 460 सुवर्णा कळसकर 476 विजया गांगर्डे 512
फेरमतमोजणीत दोन्हीही उमेदवारांची एक-एक मत कमी झाले आहे. या मतमोजणी मध्ये ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सुवर्णा कळसकर यांची दोन मते कमी झाली, तरीही त्या दोन मतांनी विजयी झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम पाटील व गुलाब तनपुरे यांचे एक मत वाढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामचंद्र भोसले यांची तब्बल 18 मतांची वाढ यामध्ये झाली आहे. भाजपचे नंदराम नवले व काकासाहेब तापकीर यांची प्रत्येकी एक मत वाढले. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये भाजपच्या विजया गांगर्डे यांची तीन मते कमी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासाहेब अनभूले यांची दोन मती कमी झाली तर मधुकर घालमे यांचे एक मत कमी झाले.