

करंजी : पुढारी वृत्तसेवा : नगर-पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडले आहे. हे काम लवकर पूर्ण होईल, असे वाटत नाही. मात्र, करंजी, देवराई, जांबकौडगाव येथे अर्धवट व खराब रस्त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रखडलेल्या कामामुळे प्रवाशांमधून देखील मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांनी या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर पुढील सहा महिने या कामाला चांगली गती मिळाली. त्यानंतर मात्र अधिकारी, ठेकेदार, पदाधिकारी यांनी सगळ्यांनीच मिलीभगत केली की काय माहित नाही. परंतु, या रस्त्याची दिशाच बदलून गेली.
करंजी गावाजवळ काढण्यात आलेला बायपास, तसेच उत्तरेश्वर मंदिर, बसस्थानक परिसरात या महामार्गाचे सुरू असलेले काम पाहता, या रस्त्याचे ना अतिक्रमण हटविले ना रुंदीकरण केले. उलट पहिल्यापेक्षा सध्या अधूनमधून काम सुरू राहत असल्याने ते आणखीनच निकृष्ट पद्धतीचे होत आहे. रखडलेल्या कामामुळे व वाहनांच्या वर्दळीमुळे करंजी गावाजवळ मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे महामार्गालगत असणार्या सर्व नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही धूळ आता अर्ध्या गावात पोहोचली आहे. महिनाभरापूर्वी करंजी गावाजवळील बायपासचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर पंधरा दिवसांत हे काम बंद करून, देवराई गावाजवळील बायपासचे काम सुरू करण्यात आले. आता दोन्ही ठिकाणचे काम सध्या बंद असून, ठेकेदाराची यंत्रणा कुठेच जवळपास दिसून येत नाही. रखडलेले काम व दररोज उडणार्या धुळीमुळे प्रवाशांचे व नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहेत.
नगर पाथर्डी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक प्रवासी तिसगाव-मांडवा मार्गे कोल्हार घाटातून नगरला जातात. तर, काही प्रवासी पाथर्डी-माणिकदौंडी मार्गे नगरला ये जा करतात. या महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी चार दिवसांपूर्वीच नगरच्या दौर्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदाराला नोटिसा देण्यात आल्या आहेत. या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी पोहोचलेल्या आहेत. नोव्हेंबर अखेर या महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मोठा निर्णय होऊन, अर्धवट काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असे राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पवार यांनी सांगितले.
जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर धूळ उडू नये, यासाठी टँकरने पाणी मारण्याची व्यवस्था करावी. तसेच, महामार्गाचे काम पूर्वी झालेल्या इस्टिमेट प्रमाणेच रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. थातूरमातूर पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा येथील छानराज क्षेत्रे, प्रकाश शेलार यांनी दिला आहे.