नगर : कांदाप्रश्नी भजने गात ‘रास्ता रोको’ ; आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुपा चौकात आंदोलन

नगर : कांदाप्रश्नी भजने गात ‘रास्ता रोको’ ; आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुपा चौकात आंदोलन
Published on
Updated on

सुपा : पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांसह पारनेर, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन नगर-पुणे महामार्गावर सुपा चौकात शनिवारी (दि.4) सकाळी रास्ता रोको केला. आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली भजने म्हणत व रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन करण्यात आले. शिंदे व फडणवीस सरकारचे शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. थकबाकीच्या नावाखाली शेतीपंपांचा वीजपुरवठा तोडला जात आहे. शेतीसाठी लागणारी खते व औषधांचे भाव वाढले आहेत. तर, दुसरीकडे कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

सरकारने तातडीने कांद्याची निर्यातबंदी हटवावी व हमीभाव द्यावा, अशी मागणी आमदार लंके यांनी केली. हे सरकार शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अ‍ॅड. राहुल झावरे, खंडू भुकन, गंगाराम बेलकर, अशोक सावंत, जयसिंग मापारी, विजय पवार, सचिन पवार, सचिन काळे, अमोल पवार, किरण पवार, विक्रम कळमकर, सरपंच प्रेमा मगर, दादा शिंदे, मीनाताई मुंगसे, जितेश सरडे, सुभाष लोंढे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, घनश्याम बळप, उपनिरीक्षक तुळशीराम पवार यांच्यासह पारनेर, सुपा, नगर व वाहतूक कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, निवेदन घेण्यासाठी नायब तहसीलदार गणेश आढारी आल्याने आमदार लंके भडकले. तहसीलदार, प्रांताधिकारी का आले नाहीत, असा सवाल करीत आंदोलन चालूच राहील. आमच्यावर गुन्हे दाखल करा, असे ते म्हणाले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने केलेली विनंती व प्रवाशांना होणारा अडथळा लक्षात घेऊन आमदार लंके यांनी नायब तहसीलदारांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला.

पगार सरकारचा, 'लोणी' खातात 'प्रवरे'चे!
रस्ता रोकोच्या ठिकाणी तहसीलदार न आल्याने आमदार लंके यांनी महसूल विभागाचा निषेध केला. महसूल विभाग पगार घेते सरकारचा, पण 'लोणी' खाते 'प्रवरे'चे, अशा शब्दात नामोल्लेख टाळत त्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news