

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी हाय होल्टेज ड्रामा होणार असल्याचे चित्र आहे. भाजप, राष्ट्रवादीला समसामन 9-9 जागा मिळाल्याने सभापती पदाचा तिढा वाढला आहे. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीमध्ये लॉटरी लागणार? एकमेकांचे संचालक फोडाफोडी करण्यात भाजप, राष्ट्रवादीला यश येणार का? हे पाहणे ऐस्तुक्याचे ठरणार आहे.
आज (दि.16) बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार असून, सर्व 18 संचालकांना 1 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत अजेंडा दिला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एफ. निकम, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.बी. मुंडे काम पाहणार आहेत.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला नऊ तर राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्याने सभापतीपदाचा तिढा वाढला. जामखेडमध्ये ईश्वर चिठ्ठी का, फोडाफोडी होते हे पाहणे ऐस्तुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे मतदारांनी समतोल ठेवल्याने राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे.
दोन्ही आमदारांना समसमान जागा मिळाल्या. आता, सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आमदार पवार व आमदार प्रा. शिंदे या दोघांच्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सभापतीपदाचा पेच राहणार आहे. सभापतीपद ईश्वर चिठ्ठीने का फोडाफोडीने निवड होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलिस प्रशासनाकडून वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणी अनुचित प्रकार केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
भाजप-राष्ट्रवादीला समसमान 9 -9 जागा मिळाल्या असल्याने सभापतीपद निवडीचा तिढा आहे. त्यामुळे सर्व 18 संचालक हात उंचावून मतदान करण्याची मागणी करणार का? गुप्त पद्धतीने मतदान करणार हे उद्याच ठरणार असून, निवडणूक हात उंचावून का गुप्त मतदान याबात संचालकांच्या बहुमताच्या मागणीचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. या निवडीकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे यांनी कर्जत जामखेडचा सभापती भाजपचा होईल? असे सुतोवाच केले होते. त्यामुळे खासदार डॉ. विखेंकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही तालुक्यात डॉ. विखेंचा करिष्मा चालणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार पवार गटाचे सुधीर राळेभात, अंकुश ढवळे, कैलास वराट, तर आमदार प्रा. राम शिंदे गटाकडून गौतम उतेकर, शरद कार्ले, सचिन घुमरे स्पर्धेत आहेत. कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे.