

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील खोलेश्वर मंदिरातील खांबावर शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील सतराव्या शतकात कोरलेला शिलालेख आढळून आला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून जुन्या वळण आक्षराचा 8 ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे. रंगरंगोटीमुळे तसेच काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत. शिवपूर्व काळातील शिलालेख फार कमी प्रमाणात मिळतात. त्यात भोसले घराणे कारकीर्द असणारी शिलालेख कमीआहेत. शिलालेख वेरूळ, शिखर शिंगणापूर, रायगड, गोवा याठिकाणी आहेत.
फर्जद शाहजीराजे भोसले यांच्याकडे मालोजीराजे यांची वडिलोपार्जित सुपे, इंदापूर चांभारगोंदे, शिखर शिंगणापूर येथील जहागीर होती. तसे आदिलशाही फर्मान उपलब्ध आहे. शिलालेखात आलेले कसबे चांभारगोंदे म्हणजे आजचे श्रीगोंदे हे त्या काळचे मुख्य व्यापारी केंद्र गाव होते. तेथील मुख्यतोदीस कृष्णाजी मोकादम म्हणजेच त्याच्याकडे गावचे पाटीलकीचे सर्व अधिकार आसावेत. एखाद्या जहागिरीच्या अखत्यारित राहून तेथील सर्व अधिकार वापरून श्री खोलेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधून जनसामान्यकरिता सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक कार्य करून ती माहिती शिलालेख स्वरूपात कोरून सर्वासमोर ठेवणे हेच या शिलालेखचे विशेष महत्व आहे. शाहजी राजे हे आपल्या पूर्वजांप्रमाणे, आध्यातिक धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर होते, हे या शिलालेखातून स्पष्ट होते. त्यांच्या कारकिर्दीतील शिलालेख मिळणे हेच या शिलालेखाचे महत्व असल्याचे शिलालेखाचे वाचक अनिल किसन दुधाने यांनी सांगितले.
शिलालेख संशोधन व माहिती कार्यात शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, प्रवीण भोसले, सतीश कदम, प्रसाद शिंदे, गणेश कुदांडे, मारुती वागसकर यांचे मोलाचे सहकार्य व मदत झाली. वीरगळ अभ्यासक, इतिहास संशोधक अनिल दुधाने यांच्या माध्यमातून आणि शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुक्याचा इतिहास नव्याने अभ्यासला जात आहे. उजेडात आलेल्या शिलालेखवरून लुप्त श्रीगोंदयाचा इतिहास उजेडात येण्यास मदत होईल असे शिवदूर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले.
शालिवाहन शकाच्या 1550 व्या वर्षी विभव संवत्सरातील ज्येष्ठ वद्य पंचमी म्हणजेच गुरूवार 12 जून 1628 या दिवशी कसबे चांभारगोंदे येथील कृष्णाजी मोकदंम पाटील याने श्री खोलेश्वर महादेव मंदिर बांधले. पूर्वी गावासाठी 'कसबा' हा शब्द वापरला जात असे. ग्रामीण भागात खेडेगावाचे मौजे आणि कसबा (खुर्द) असे दोन भेद मानले जातात. कसबा म्हणजे कसबी किंवा विशेष कौशल्य असणारे लोक जिथे राहतात, अशा लोकांचे गाव.
शिलालेखाचे स्थान : खोलेश्वर मंदिराच्या सभामंडपात उजव्या बाजूच्या खांबावर मध्यभागी कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : खोलेश्वर मंदिर बांधल्याची / बांधकमाची स्मृती जपणे.
मिती/वर्ष : सतरावे शतक – शके 1550 ज्येष्ठ वद्य पंचमी विभव संवत्सर
काळ वर्ष : सतरावे शतक = 12 जून 1628 गुरूवार
कारकीर्द : निजामशाही कारकीर्द, जहागीर शाहजी राजे भोसले
व्यक्तिनाम : कृष्णाजी मोकदम पाटील.
ग्रामनाम : कसबे चांभारगोंदे ( श्रीगोंदे)
शिलालेखाचे वाचक : अनिल किसन दुधाणे