

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा नवीन व्हेरियंट काही देशात दाखल झाला असून, केंद्र सरकारने राज्य शासनाला सतर्क राहाण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जिल्हास्तरावर अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत. निर्देश प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मास्क वापरणे बंधनकारक नसले तरी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे कधीही चांगलेच आहे. ज्या कोणी बुस्टर डोस घेतला नाही, त्यांनी तो घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने नागरिकांना केले आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी कोरोनाने जिल्हाभरात हैदोस घातला होता. जवळपास चार लाख नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. 97 टक्के बाधित उपचाराने बरे झाले. मात्र, या प्रादुर्भावाने आठ हजार बाधित दगावल्याची नोंद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जनजीवन सुरळीत सुरु आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना धडकी भरली आहे. चीन, जपानसह काही देशांत कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला आहे.
त्यामुळे देशांतील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यांना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, बुस्टर डोस घेण्याचे आवाहन जनतेला करा, असे निर्देश दिले आहेत. कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढणार असल्यामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप जिल्हास्तरावर कोरोनाबाबत कोणत्याच सूचना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यांच्याकडून ज्या क्षणी सूचना येतील त्यावेळी सूचनांचे तंतोतंत पालन केले जाणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी नमूद केले.
मास्क वापरणे कधीही चांगलेच आहे. सर्दी, खोकला आदी आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या वा सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कच वापरवा. मास्क बंधनकारक नसला तरी, हवेतून प्रसार होणार्या संसर्गापासून संरक्षण करतो. त्यामुळे मास्क वापरणे हिताचेच असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.