मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांनी मिरजगाव व कर्जत येथील अधिकृत आडते व्यापारी यांनाच उडदाची विक्री करावी. हिशेब पट्टी व तोलाई पावत्या घ्याव्यात, असे आवाहन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील खरीप हंगामात पेरणी केलेला उडीद सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात विकायला येत आहे. मिरजगाव व कर्जत येथील बाजार समितीच्या आवारात अधिकृत आडते व्यापारी हा उडीद खरेदी करत आहेत. असे असताना कर्जत तालुक्यातील काही ठिकाणी खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने नेमलेल्या परवानाधारक व्यापार्यांनाच उडीद द्यावा व त्यांच्याकडून हिशेब पट्टी व तोलाई पावती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, याचा गैरफायदा घेण्यासाठी काही खासगी व्यापारी बाहेर कमी दराने उडीद खरेदी करत आहेत. यामध्ये शेतकरी व मार्केट कमिटी या दोघांचाही तोटा होत आहे. शिवाय भविष्यात शासनाची काही योजना आली, तर खासगीत उडीद खरेदी केलेल्या व्यापार्यांना शेतकरी कोणतीच पावती मागू शकत नाहीत. यामुळे असे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतात. यासाठी शेतकर्यांनी अधिकृत आडते व्यापार्यांनाच उडीद विक्री करावी. अधिकृत किंवा खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती तापकीर यांनी दिला आहे. यावेळी उपसभापती आबासाहेब पाटील उपस्थित होते.
मिरजगाव भागात खरीप हंगामात पेरणीपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामुळे या भागात उडदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच, कुकडी पट्ट्यात दोनदा पाणी आले. यामुळे कर्जत तालुक्यातील उडीद पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र वाढले आहे. यामुळे उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकूण क्षेत्राचा विचार करता यावर्षी उडदाचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या वर्षी 25 हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली होती. तर, यावर्षी फक्त 13 हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. मात्र, मिरजगाव व कर्जत येथील क्षेत्र वाढले आहे. यामुळे संस्थेच्या हितासाठी सर्व व्यवहारावर लक्ष ठेऊन संस्थचे उत्पन्न कसे वाढेल, याची दक्षता घेतली जाणार आहे.
उडीद पेरणी क्षेत्रात पन्नास टक्के घट
उडीद उत्पादनात कर्जत तालुका राज्यातील टॉप थ्री मध्ये होता. गेल्या वर्षी पेरणी, उत्पादन व उडदाला सर्वाधिक दर देण्यात तालुका आघाडीवर होता. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्याने उडीद पेरणी क्षेत्र पन्नास टक्के घटले आहे. यामुळे उडदाची मागणी पूर्ण होईल असे वाटत नसल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.
हेही वाचा :