

चिचोंडी पाटील; पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने पालकांनी लोक सहभागातून शाळेत 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविले. यासोबत शाळेतील मुलांना खेळण्यासाठी खेळणी दिली होती. लोकसहभागातून बसवलेल्या या 'सीसीटीव्ही'ची नोंद शाळेत असलेल्या डेडस्टॉक रजिस्टरला घेतली आहे. परंतु, सध्या शाळेत दिलेल्या बिलाप्रमाणे कॅमेरे अस्तित्वात नाहीत, असे दिसून येत आहे.
त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांना पालकांनी दिले आहे. निवेदनात म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवण्यात आले. याचा उद्देश सहा ते 14 वर्षे वयोगटातील बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे होणारे लैंगिक शोषण बाब पाहता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने वेबसाईट आणि प्रत्येक शाळेत पोस्को-बॉक्स तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच शाळा परिसरात 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. चोरीची घटना घडू नयेत म्हणून पालकांनी लोकसहभाग जमवून 61 हजार 200 रुपये खर्चून 'सीसीटीव्ही' बसविण्यात आली. परंतु, आज शाळेत दिलेल्या बिलाप्रमाणे कॅमेरे अस्तित्वात नाहीत, असे दिसून आले.
नगर तालुका पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी अशीमा मित्तल (भा.प्र.से) यांनी चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळे विषयी ग्रामसंजीवनीमधून नगर तालुक्याची ग्रामीण यशोगाथामध्ये अनुक्रम नंबर आठवा उल्लेख केला आहे. त्यामध्ये गावाने शाळेसाठी दिलेला लोकसहभाग विषयी उल्लेख आहे. या शाळेला मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून आठ ते दहा लाखच्या वस्तू शाळेला दिलेल्या आहेत.
ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद गावातील पतसंस्था सोसायट्यांनी दिलेला सहभाग वेगळाच आहे. या वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी त्याचबरोबर शाळेमध्ये चोरीचा व इतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व शाळेला 'सीसीटीव्ही' बसविले. तरी कॅमेरे व खेळण्या कुठे गेले, याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली.