सावेडी : सोने खरेदीदारांवर ‘आयकर’चा वॉच!

File Photo
File Photo

सोमनाथ मैड

सावेडी : केंद्र सरकारने पॅन कार्डला 'आधार' लिंक आवश्यक केल्यापासून बेहिशेबी पैसे सोनेखरेदीत गुंतविले जात असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत सोनेखरेदीच्या नियमांमध्ये सरकारने बदल केला असून, आता 49 हजार 999 रुपयांचेच सोने मुक्तपणे खरेदी करता येणार आहे. 50 हजार किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांना ओळखपत्र (केवायसी) अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी ही मर्यादा दोन लाख रुपये होती.

केंद्र सरकारने मनी लाँडरिंग कायदा 2002 एक जुलै 2005पासून अमलात आणला. त्याअंतर्गत एक जुलै 2020पासून सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे नियम कडक करण्यात आले आहेत. यापूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करताना आधारकार्ड व पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून यामध्ये बदल करून ती दोन लाखांची मर्यादा 50 हजारांपर्यंत खाली आणली आहे.

सोन्याचे दागिने विकताना सुरुवातीला 4 अंकी हॉलमार्क लागू होत नाही, तोच त्यात 6 अंकी एचयूआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) लागू करण्यात आला आहे. त्या किचकट प्रक्रियेला व्यापारी-ग्राहक सामोरे जातात तोपर्यंतच सोने-चांदीच्या व्यवहाराचे नियमही आणखी कडक केले. एखाद्या ग्राहकाने एका वर्षात अनेकदा एकूण 10 लाख रूपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी केल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक राहणार आहे.

एचयूआयडीसाठी 30 जूनपर्यंत मुदत
सरकारने देशातील 288 शहरांमध्ये एकूण 1350 हॉलमार्क सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये बीएसआय (भारतीय मानक ब्यूरो) कडे 43 हजार 153 व्यावसायिकांनी आतापर्यंत नोंदणी केली असून, सुमारे दहा कोटी दागिन्यांच्या वस्तूंचे हॉलमार्किंग करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक व्यापार्‍यांच्या सोन्याच्या हॉलमार्क वस्तू विक्री न झाल्याने त्यांना सोन्याच्या वस्तूंना एचयूआयडी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात येणार आहे.

मोडीचे पैसे धनादेशाने
सराफांनी ग्राहकांकडून सोन्याची (मोड) खरेदी करताना त्या ग्राहकाचे आधार कार्ड, मोबाईल नंबर घेताना, 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम धनादेशाने द्यावी, अशा सक्त सूचना सरकारने केल्या आहेत.

ग्राहक पारदर्शकतेसाठी मोठ्या व्यावसायिकाकडे धाव घ्यायचा. परंतु, एचयूआयडीच्या अनिवार्यतेमुळे सर्व दुकानांत सोन्याच्या एकाच कॅरेटच्या वस्तू मिळतील, हा विश्वास वाढून ग्रामीण भागातील सराफी व्यवसायात वाढ होईल.

                               – किरण आळंदीकर, राज्य समन्वयक, इंडिया बूलियन ज्वेलर्स

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news