नगर : सामाजिक न्याय भवनचे आज उद्घाटन, मुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार

नगर : सामाजिक न्याय भवनचे आज उद्घाटन, मुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार

नगर : पुढारी वृत्तसेवा : येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आजी (दि.19) सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत, असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी सांगितले. नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी बसस्थानकाशेजारी सामाजिक न्याय भवनाचे भूमिपूजन 30 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले होते. जवळपास आठ कोटी रुपये खर्चाची भव्य अशी तीन मजली इमारत उभारण्यात आली. समाजकल्याण विभागाशी संबंधित सर्व कार्यालये आता या इमारतीच्या एका छताखाली आल्यामुळे लाभार्थ्यांची इतरत्र होणारी पायपीट वाचणार असल्याचे सहाय्यक आयुक्त देवढे यांनी सांगितले.

महापालिका नगररचना विभागाने 29 ऑगस्ट रोजी या इमारतीस भोगवाटा प्रमाणपत्र प्रदान केले. त्यामुळे ही इमारत वापरण्यास आता उपलब्ध झालेली आहे. सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. या समारंभास नगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे उपस्थित राहाणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक समाजकल्याण विभागाचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news