नगर : पुढारी वृत्तसेवा : महिना–दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, गुरुवारपासून (दि. 21) शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सरासरी 38.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे गेल्या साडेतीन महिन्यांत पहिल्यांदाच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. शेवगाव आणि नेवासा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे–नाले पहिल्यांदाच वाहते झाले. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शनिवारीही जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरी 544.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र पावसाने गुंगारा दिला. साडेतीन महिन्यांत फक्त 228 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसात फक्त खरीप पेरणी झाली. ओढे–नाले वाहिले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले. पाऊस गेला असे वाटत असतानाच गुरुवारी जिल्हाभरात पावसाने पुनरागमन केले. गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या साडेतीन महिन्यांत पहिल्यांदाच अकोले वगळता जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसाने शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
शेवगाव ः 72.2, नेवासा 65.5
शेवगाव व नेवासा तालुक्यांत गुरुवारी अतिवृष्टीची नोंद झाली. शेवगाव तालुक्यात 72.2, तर नेवासा तालुक्यात 65.5 मिलीमीटर पाऊस झाला. श्रीगोंदा, पाथर्डी व कोपरगाव या तीन तालुक्यांत सरासरी 50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात सर्वांत कमी 9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व तेरा तालुक्यांत 23 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद गुरुवारी झाली आहे. अकोले तालुक्यांतील साकीरवाडी, राजूर, शेंडी व कोतूळ या चार मंडलांमध्ये सर्वांत कमी प्रत्येकी 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 महसूल मंडलांत 9 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 38.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पावसाची सरासरी आता 268.5 मिलीमीटरवर पोहोचली आहे.
दरम्यान, दुसर्या दिवशी शुक्रवारीदेखील पावसाने हजेरी लावली. नगर शहरात दुपारी 12 पासूनच पावसाने जोर धरला होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्हाभरात ओढे–नाले पहिल्यांदाच वाहू लागले आहेत. या दमदार पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
17 मंडलांमध्ये अतिवृष्टी
पारनेर तालुक्यातील टाकळी, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा, बेलवंडी व कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, शेवगाव तालुक्यातील शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव व एरंडगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव व मिरी, नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाणा व कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव अशा 17 महसूल मंडलांमध्ये गुरुवारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नेवासा बुद्रुक मंडलात सर्वाधिक 115.8, तर कोळगाव मंडलात 114.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित पंधरा मंडलांमध्ये 65.3 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
गुरुवारी पडलेला पाऊस
नगर : 32.1, पारनेर : 34.3, श्रीगोंदा : 52.5, कर्जत : 28.5, जामखेड : 34, शेवगाव : 72.2, पाथर्डी 52.6, नेवासा : 65.5, राहुरी : 29.9, संगमनेर : 23.8, अकोले : 9, कोपरगाव : 49.8, श्रीरामपूर : 26.8, राहाता : 37.
आतापर्यंतचा पाऊस व टक्केवारी
नगर : 288.4 (60), पारनेर : 265.4 (64), श्रीगोंदा : 276.3 (68), कर्जत : 257.3 (57), जामखेड : 373.6 (65), शेवगाव : 339.9 (73), पाथर्डी : 355.6 (75), नेवासा : 293.4 (68), राहुरी 151 (35), संगमनेर : 165.6 (47), अकोले : 372.6 (76), कोपरगाव 222.3 (55), श्रीरामपूर : 167 (36), राहाता : 227.5 (50). (मिलीमीटर)
अतिवृष्टीचा इशारा; सतर्कता बाळगण्याचे आवाहन
जिल्हाभरात 23 व 24 सप्टेंबर या दोन दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. येत्या दोन दिवसांत वादळी वारे, वीज, गारपीट आणि मुसळधार पाऊस यापासून स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 यांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.