

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी कर्मचारी, ग्रामसेवकच पुरेशा प्रमाणात नाहीत, अशी तक्रार करत त्याची संख्या वाढवण्याची मागणी शेतकर्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली. लोखंडे यांनी अधिकार्यांना दखल घेण्याच्या सूचना केल्या. खासदार लोखंडे यांनी बुधवारी दुपारी देवगाव, जेऊर हैबती, देडगाव, वडुले शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला.
तहसीलदार संजय बिरादार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, मंडल कृषी अधिकारी वृषाली पाटील, गटविकास अधिकारी संजय दिघे, सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, कुकाणा मंडलाधिकारी अय्या फुलमाळी आदी सरकारी यंत्रणा सोबत होती.
देवगावात लाला पटेल या तरुण शेतकर्याचा गहू भुईसपाट झाला. टरबूजवाडी व केळी बाग उद्ध्वस्त झाली. सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले. पटेल यांनी खासदार लोखंडे यांना नुकसानीची माहिती दिली.
बाबा कदम यांच्या घराचे नुकसान झाले. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी जेऊर हैबती शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. देवगावच्या सरपंच सुनीता गायकवाड, जेऊर हैबतीचे सरपंच महेश म्हस्के यांनी पीक पंचनामे, वीजसमस्या खासदार लोखंडे यांच्या मांडताच त्यांनी दखल घेण्याची सूचना तहसीलदार व कृषी अधिकार्यांना केली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, उपप्रमुख भगवान गंगावणे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, माजी उपसभापती देवीदास साळुंके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके, मीरा गुंजाळ, संजय पवार आदी उपस्थित होते.