

बोधेगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाळू वाहतूकदारांवर पोलिसांनी कारवाई करीत तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बोधेगाव येथील मुंडे चौकातून शुक्रवारी (दि. 26) सकाळी 9.10 वाजता एक डंपर जात असताना त्यास पोलिसांनी थांबविले. डंपर चालक एकनाथ पांडुरंग मिसाळ (वय 34, रा.बोधेगाव, ता.शेवगाव) यास ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत पोलिसांनी माहिती विचारता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. डंपर चालकाने बेकायदा वाळू वाहतूक केली असल्याने त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दि.24 मे रोजी शेवगाव येथील भगतसिंग चौकातून वाळू वाहतूक करताना डंपर पोलिसांनी पकडला. डंपर चालक बेकायदा वाळू वाहतूक करीत असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोन्ही कारवाईमध्ये तब्बल 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, पोलिस नाईक शेळके, बाळासाहेब नागरगोजे, पोलिस हवालदार नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल बप्पासाहेब धाकतोडे, राहुल खेडकर यांनी हीकारवाई केली.