जवळ्यात अवैध धंदे, गुटखा विक्री जोमात

जवळ्यात अवैध धंदे, गुटखा विक्री जोमात

जवळा; पुढारी वृत्तसेवा : सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेऊन अकरा वर्षे उलटली. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत प्रशासनाला अकरा दिवसही गुटखा विक्री थांबविता आलेली नाही. पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात दारू, मटका, जुगार या अवैध धंद्याबरोबरच गुटखा विक्री दिवसाढवळ्या सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागात मागील काही काळात गायछाप ही तंबाखू चुना यांचे मिश्रण लावून खाण्यात यायची. परंतु, गुटखा खाण्याची फॅशन आली आणि तरूण वर्गामध्ये आकर्षक पॅकिंगमधील गुटखा खाण्याचे आकर्षण वाढत गेले. त्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने गुटखा सेवन, उत्पादन, विक्री, वाहतूक यावर बंदी आणली. परंतु, सरकारचा हेतू अकरा वर्षांतही साध्य झालेला नाही.

कारण, उत्पादन, विक्री बंद असूनही दिवसाढवळ्या पानपट्ट्या, दुकाने, हॉटेल्स व इतर व्यावसायिकांकडे गुटखा अगदी बिनधास्तपणे विकला जात आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच बरोबर अवैध देशी-विदेशी बनावट दारू, मटका, जुगार हे धंदेही बेमालूमपणे सुरू आहेत. ताडीचीही मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते.

मात्र, पोलिस व अन्न आणि औषध प्रशासन या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जवळा परिसर अवैध धंद्यांचे माहेरघर बनू लागले आहे. तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन गुन्हेगारी वाढू पाहत आहे. पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करत वेळीच अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news