

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त नेवासा शहरात बसस्थानकासमोर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तर, न घातलेल्या वाहनधारकांची कायद्याच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल सरकटे आणि शीतल तळपे व नेवासा तालुका मोटार ड्राईव्हिंग स्कूल यांच्या वतीने सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. नेवासा शहरात अचानक रस्त्यावर अधिकारी वाहनांची तपासणी करू लागल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी कारमध्ये सिटबेल्ट लावलेल्या वाहनधारकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तर, न लावलेल्या चालकांना नियमांच्या काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देऊन अधिकार्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती केली. पादचार्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूला चालण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मुख्याधिकार्यांचा सत्कार
वाहनांची तपासणी सुरू असताना नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ हे गाडीतून चालले होते. अधिकार्यांनी त्यांना थांबवून त्यांनी सिटबेल्ट लावल्यामुळे गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
माणुसकीचे दर्शन
शहरात जनजागृती सुरू असताना रस्त्याच्या बाजूने जाणार्या एका वयोवृद्ध महिलेस चक्कर येऊन ती खाली पडली. यावेळी अधिकारी शीतल तळपे यांनी तत्काळ मदतीला धावून आधार देऊन त्यांना पाणी पाजले. रस्ता सुरक्षा सप्ताहात असेही माणुसकीचे दर्शन घडले.