लोणी : पुढारी वृत्तसेवा : लोणी गावात मंगळवारी (दि. 6) सायं 7 वा ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे लोणी खुर्दमधील माणिकनगर, भीमनगर, दत्तनगरमध्ये पाणीच पाणी झाले. या भागातील बहुतांश घरात पाणी घुसले. लोणी-संगमनेर रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे लोंढे वाहत होते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर हे पाणी दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे व्यापार्यांचे नुकसान झाले. जनावरांच्या बाजारजवळील भीमनगरमध्ये वास्तव्यास असलेले बरेचं कुटुंबाचे संसार पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. सुमारे 50 ते 70 घरांमध्ये पाणी शिरले होते. या कुटुंबाचे रात्री उशिरापर्यंत गावातील नागरिकांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, जि. प. प्राथमिक शाळामध्ये स्थलांतर करण्यात आले.
रात्री त्या कुटुंबाला गावातील गणेश मंडळाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी रात्री उपविभागीय आधीकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच नुकसान झालेल्या नागरिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
लोणी खुर्द गावातील शेतकर्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन, बाजरी, मका जनावरांचे चारा पिके पाण्यात गेले असून फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकर्यांचा हातातोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकर्यांकडून प्रचंड मनस्ताप केला जात आहे. रात्री दीड वाजेपर्यंत घटनास्थळी मंडळाधिकारी आनिल मांढरे, कामगार तलाठी श्रीमती मंजुश्री देवकर यांच्यासह ग्रा. पं. कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे परीसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोणी बुद्रूक येथील बाजारपेठेमध्ये पाणी घुसल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. या दरम्यान प्रशासनाला कसरत करावी लागली लागलेली आहे. लोणी- कोल्हार रोड वरती दरम्यान पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. काल सकाळी महसूलच्या अधिकार्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे. या पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यांचेही पंचनामे होणार आहेत. सकाळच्यावेळी पाण्याखाली घरे गेलेल्या कुटुंबीयांनी आपले घरातील सामान बाहेर काढले. घरातील सर्व साहित्य भिजल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना नागरिकांनी दिलासा दिला.
मंत्री विखेंच्या पंचनामा करण्याच्या सूचना
महुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला नुकसानाची पाहणी करून त्यांचे पंचनामे हे तातडीने करून लोकांना सर्वतोपरी मदत करावी, असे आदेश दिले, अशी माहिती लोणी मंडल अधिकारी अनिल मांढरे यांनी दिली.