आढळगावला गारपीट; पिकांचे मोठे नुकसान, आ. पाचपुते यांनी केली पाहणी

आढळगावला गारपीट; पिकांचे मोठे नुकसान, आ. पाचपुते यांनी केली पाहणी

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आढळगाव परिसरातील काही गावांना वादळी वार्‍यासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. दहा मिनिटांच्या गारपिटीने द्राक्ष, पेरू, लिंबू, पपई, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. दरम्यानस काल (दि. 16) दिवसभर महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. गेल्या आठवडाभरापासून ठिकठिकाणी गारपिटीचा तडाखा बसत आहे.

वातावरण शांत होत असतानाच शनिवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजता वादळी वार्‍याला सुरुवात झाली. त्यानंतर काही मिनिटांतच गारा पडण्यास सुरुवात झाली. दहा मिनिटांच्या गारपिटीने द्राक्ष, पेरू, पपई, आणि लिंबू पीक जमीनदोस्त झाले. काढून ठेवलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले.

मनोज ठवाळ यांच्या दोन एकर द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले. विक्रीचा भाव निश्चित होऊन दोन दिवसांत द्राक्ष घेऊन जाण्याचे ठरले असतानाच गारपिटीच्या तडाख्याने पूर्ण बाग जमीनदोस्त झाला. दादा रायकर यांच्याही द्राक्ष बागेचे नुकसान झाले. चंद्रकात शिंदे, सुनील शिंदे, उद्धव निकम, शरद निकम, विष्णू शिंदे, संदीप शिंदे यांच्या शेतातील डाळिंब, पपई, पेरू पिकाचे मोठे नुकसान झाले.

आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, सभापती बाळासाहेब नाहटा, शरद जमदाडे, बापूशेठ गोरे, अशोक खेंडके, सरपंच शिवप्रसाद उबाळे, सुभाष गांधी, हरिदास शिर्के, मनोहर शिंदे यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले, रात्रीच्या वादळाने तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तातडीने पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जातील.

नुकसान भरपाई मिळावी : जमदाडे
खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे व सरपंच शिवप्रसाद उबाळे म्हणाले, गारपिटीने फळबागा व कांद्याचे मोठे नुकसान झाले. सरकारने तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदत शेतकर्‍यांना द्यावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news