

शेवगाव (नगर) : तालुक्यातील अमरापूर परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागांत वादळी वार्यासह गारपीट होत आहे. यात भातकुडगाव, शहरटाकळी, दहिगाव भागाबरोबर चापडगाव, बोधेगाव, हातगाव परिसराला शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपले. यात पिकांचे नुकसान झाले. वादळाने घरांचे छत, टपर्या उडाल्या, काही झाडांवर वीज कोसळली. अवकाळी पावसात कांदा, बाजरी, चारा पिके भुईसपाट झाली.
शनिवार (दि.29) सकाळी 10 वाजता ढगांची दाटी झाल्याने शेतकरी भयभित झाले. काही वेळेत पाऊस सुरू झाला. शेवगाव शहरासह आसपास पावसाने चांगलेच झोडपले. दोन वेळेस झालेल्या पावसानंतर दुपारी दोन वाजता अमरापूर परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. वरुर, भगूर, फलकेवाडी,वाघोली आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
यात कांदा, बाजरी, मका, घास इत्यादी चारा पिके, भाजीपाला,फळबागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे. एकंदर सलग पाच-सहा दिवस झालेल्या पावसात तालुक्यातील नुकसान पाहता शेतकर्यांवर अवकाळी संकट तयार झाले आहे. याबाबत शासनाने दखल घेऊन तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत व शेतकर्यांना मदतीचा हातभार द्यावा, अशी मागणी होत आहे.