

नगर, पुढारी वृत्तसेवा: माध्यमिक शिक्षक सोसायटीचा कारभार करताना विरोधी दोन संचालकांकडून नेहमीच आडमुठी भूमिका घेतली जाते. त्यांच्या नेहमीच्याच अरेरावी आणि दादागिरीविरोधात काल सोमवारी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी संचालकांनी माध्यमिक सोसायटीसमोर आंदोलन करत निदर्शने केली.
सोसायटीची मे महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी संचालक करत आहेत. लाभांशाबरोबर कायम ठेवीवरील व्याज द्यावे, अशी संस्थेची उपविधी असून त्याची पूर्वकल्पना विरोधकांना असताना सुद्धा तरीही सभासदांना एकत्र करून संस्थेसमोर संस्थेची कुठलीही पूर्व परवानगी व पूर्वकल्पना न देता संस्थेच्या आवारात आंदोलन केले जाते.
संस्थेच्या कारभाराबाबत सहकार मंत्र्यांपर्यंत तक्रारी करून संबंधित अधिकार्यांवर दबाव विरोधक आणतात,अशी टीकाही यावेळी सत्ताधार्यांनी केली. विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काल सत्ताधारी संचालकांनीही निदर्शने करून विरोधकांना 'जशास तसे उत्तर ' देण्याचा इशारा दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठुबे, उपाध्यक्ष धोंडीबा राक्षे, तज्ज्ञ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे, संचालक सुरेश मिसाळ, सूर्यकांत डावखर, संजय कोळसे, बाळासाहेब सोनवणे, अण्णासाहेब ढगे,धनंजय म्हस्के, सत्यवान थोरे, चांगदेव खेमनर, अनिल गायकर, उत्तम खुळे, ज्ञानेश्वर काळे, कैलास राहणे, आशा कराळे, काकासाहेब घुले, दिलीप काटे, मनिषा म्हस्के आदी उपस्थित होते.
सोसायटीचा कारभार चांगला चालू असताना, नेहमीच विरोधकांकडून राजकारण केले जाते. त्यांनाही पुरेसे आर्थिक ज्ञान असतानाही केवळ विरोध करायचा म्हणून आंदोलने करण्यापेक्षा चांगल्याला चांगले म्हणण्याचेही धाडस दाखवावे. आम्हालाही आंदोलन करता येते, हे दाखविण्यासाठीच आज सत्तेत असतानाही हे आंदोलने केले.
-भाऊसाहेब कचरे, तज्ज्ञ संचालक