

कर्जत (नगर): पुढारी वृत्तसेवा : बाजार समिती निवडणुकीतील एका जागेच्या फेरमतमोजणीच्या मागणीबाबत मंगळवारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्याकडे सुनावणी सुरू झाली. आज काही जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, तर ऊर्वरित साक्षी बुधवारी (दि. 10) नोंदविण्यात येणार आहेत. निवडणूक अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांचीदेखील साक्ष नोंदविण्यात आली.
लीलावती बळवंत जामदार व भरत संभाजी पावणे या दोन पराभूत उमेदवारांनी लेखी अर्ज करून सर्वसाधारणमधील एका जागेची फेरमतमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत मंगळवारी सुनावणी सुरू झाली. यामध्ये वादी व प्रतिवादी या दोघांनाही म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू असल्याने आज सुनावणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक निर्णय जाहीर करतील. आजच्या सुनावणीमध्ये सर्वसाधारण एक जागेच्या फेरमतमोजणीची मागणी केली असली, तरी एकूण 18 उमेदवारांच्या साक्षी या ठिकाणी नोंदवल्या जाणार आहेत. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत मतदारसंघातीलही दोन्ही गटांच्या उमेदवारांच्या साक्षी नोंदवल्या जाणार आहेत. आज काही जणांच्या साक्षी नोंदवल्या. उद्या इतर उमेदवारांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यात येणार आहे.
कर्जत बाजार समितीची निवडणूक राज्यामध्ये गाजली. याचे प्रमुख कारण म्हणजे आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांमध्ये मोठा संघर्ष या निवडणुकीमध्ये दिसून आला. त्यात पवार व शिंदे गटाला समान प्रत्येकी 9 जागा मिळाल्या. त्यामुळे सभापती-उपसभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर्कवितर्क सुरू
सुनावरणीनंतर फेरमतमोजणीचे आदेश दिले गेले, तर निकालात बदल होणार का, पराभूत उमेदवार विजयी होणार का, समीकरण बदलणार का, याविषयी आता तर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.