अकोले : पुढारी वृत्तसेवा : धान्य दुकानदाराकडे ऑनलाईन धान्य पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या ई-पॉस मशिनमधून हजारो लाभार्थ्यांची नावे अचानक गायब होऊन धान्य पुरवठा बंद झाल्यामुळे अकोले तालुक्यातील लाभार्थी वर्गामधून नाराजी व्यक्त होत आहे. दुकानदार आणि लाभार्थी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. ही संख्या 11 हजार 46 असल्याचे माहिती रेशन पुरवठा विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आली आहे. अकोले तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. धान्य पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी ई-पॉस मशिनचा सतत सर्व्हर डाऊन होत आहे, तर कधी हाताचे ठसे उमटत नाहीत.
तसेच आदिवासी भागातील कोतूळ, भंडारदरा, राजूर, समशेरपूर, ब्राम्हणवाडा परिसरात रेंज कधीमधी नसते. म्हणून धान्य पुरवठा बंद होत आहे. अशा अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. आता त्यामध्ये आधार लिंकची भर पडली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक झालेले नाही, अशा लाभार्थ्यांचे धान्य सध्या बंद झाल्यामुळे लाभार्थी आणि धान्य दुकानदार यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. सध्या गेल्या महिन्यात सुमारे 11 हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद झाले, कारण या लाभार्थ्यांचे आधार लिंक झालेले नाही. ज्यांचे आधार लिंक झालेले नाही, अशा लाभार्थ्यांची नावे ई-पॉस मशिनवरून गायब झाली आहेत. त्यामुळे धान्य पुरवठा होऊ शकत नाही. धान्य मिळत नसल्याने या लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. धान्य दुकानदारांच्या मते लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्यासाठी अनेक वेळा आवश्यक माहिती, आधारकार्ड देण्यात आलेली आहेत.
मात्र वेळच्यावेळी आधार लिंक झालेले नाही तसेच रेशनकार्डवर लहान मुलांची नावे आहेत; मात्र त्यांचा आधार्रनंबर नाही. अनेक ज्येष्ठांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत, त्यांचे देखील आधार लिंक वेळेवर झालेली नाही. पुरवठा विभागामध्ये दोनचं ऑपरेटर तालुक्याचा कारभार पाहत असल्याने या कामाला मर्यादा येऊ लागल्या आहेत. अकोले तालुक्यामध्ये बहुतांशी आदिवासी भाग असल्याने ई-पॉस मशिनला रेंज नसल्याने तासंनतास रेशन घेण्यासाठी रेशन धारक रेजंची वाट पाहात बसत असतात.
साडेअकरा हजार कार्ड लिंकच नाहीत
तालुक्यामध्ये एकूण धान्य घेणार्या लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 12 हजार इतकी आहे. यापैकी 11 हजार 46 लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड लिंक केलेले नाही.
तसेच काही जणांनी विवाह नोंदणी करून नावे कमी केलेली नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, मात्र आधार लिंक न केल्यामुळे धान्य बंद झालेल्यांची संख्या अधिक आहे.