नगर : शासनाला सत्तेची मस्ती : आमदार प्राजक्त तनपुरे

नगर : शासनाला सत्तेची मस्ती : आमदार प्राजक्त तनपुरे
Published on
Updated on

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा : भाजप शासनाला सत्तेची मस्ती चढली आहे. मते मिळाली नाही तरी सत्ता मिळविण्यासाठी खोके व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वाटेल तेवढे आमदार फोडू शकतो, ही भावना भाजपची आहे. राज्यातील मुलभूत प्रश्न वार्‍यावर सोडून शासन आपल्या दारीच्या नावावार कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करणार्‍या राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी जनतेत जाऊन लढाई सुरू करणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राहुरी येथील आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यामध्ये गृह व उर्जा विभागाची फरफट सुरू आहे. सत्तेच्या मोहामध्ये आपल्याकडेच सत्तासुत्रे ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची खाते ठेवले आहे. त्यामध्ये गृह खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ झालेला आहे. राज्यात कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल? याची शाश्वती राहिलेली नाही. जालना येथील अंतरावली सराटी येथे मराठा समाजाने संविधानाच्या अधिन राहून आंदोलन सुरू केले होते. परंतु त्या परिसरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्याने शासनाला ते आंदोलन मान्य नव्हते.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला व्यत्यय येऊ नये म्हणून मराठा समजाचे आंदोलन दडपण्यासाठी गृह विभागाने लाठीमार करण्याचे आदेश दिल्याची माहिती समजत आहे. निरअपराध आंदोलकांना निर्दयीपणे मारहाण करूनही गृहमंत्री फडणवीस हे राजकारण करीत आहेत. गृह खात्याकडून एवढी मोठी चूक झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा देणे हा राजधर्म होता. परंतु सत्तेची लालसा व मते मिळाली नाही. तरी खोके व यंत्रणेच्या माध्यमातून आमदार फाडू शकतो, हीच भावना निर्माण झाल्याने राज्यात सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

गृहखात्यासह उर्जा खात्याचाही बट्याबोळ झाला आहे. राज्यात अघोषित भारनियमन लादला जात आहे. एकीकडे पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तर दुसरीकडे भारनियमनामुळे खरीप पीकांना वाचविण्यासाठी पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. महावितरणने लादलेले अघोषित भारनिमयनाकडे शासनाचे लक्ष नाही. महावितरण कंपनीला कोळसा अपूर्ण पडत असल्याचे कारण दिले जात आहे. शेतकर्‍यांना अजूनही अवकाळी व सततच्या पावसाचा जाहिर केलेले निधी मिळालेला नाही. कांदा अनूदानही शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही.

2 लाखापेक्षा अधिक कर्ज असल्याने कर्जमाफीपासून अलिप्त राहिलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार मदत निधीचा लाभ नाही, कोरोना कालखंडात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार अनुदानाची अजूनही मदत नाही, असे अनेक प्रश्न आवासून उभे आहे. वर्षभराचा कालावधी उलटूनही शासनाला जनसामन्यांचे प्रश्न सोडविता आलेले नाही. कागदावर गतिमान तर योजनेचा लाभ देण्यात गतीमंद झालेल्या राज्य शासनाने जनतेचे प्रश्न वार्‍यावर सोडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी सुरू केलेला उठाठेव योग्य नाही. अनेक रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या. परंतु कार्यारंभ आदेश नसल्याने सहा महिन्यांपासून संबंधित रस्त्यांचे काम होत नाही आहे. राहुरी मतदार संघाप्रमाणेच राज्यभरामध्ये शासनाच्या कामकाजाचा बट्याबोळ पाहता जनतेला सोबत घेऊन जनआंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा आ. तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गुजरात राज्याकडून महागडी वीज खरेदी केली
आ. प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी मी उर्जा खात्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळी राज्यावर लोडशेडींगचा भार येऊ नये, राज्य अंधारात जाऊ नये म्हणून गुजराज राज्याकडून महागडी वीज खरेदी करून राज्याला अंधारात जाण्यापासून वाचविले. शेतकर्‍यांना वीजेचा लाभ दिला. परंतु सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या शासनाने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना अंधारात टाकत अघोषित भारनियमन लादल्याची टिका केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news